*अतिरिक्त साईट इंजिनिअर नियुक्तीचे निर्देश, दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश*
सिंधुदुर्गनगरी :
सावंतवाडी शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे काम गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर आढावा बैठक घेतली.
यावेळी कामातील प्रगती, अडचणी आणि पुढील कृती आराखड्याचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा लखम भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औधकर, पीएमसी ॲक्वॉकॉन कन्सल्टंट ॲण्ड इंजिनिअर प्रा. लि. चे राहुल सूर्यवंशी तसेच मक्तेदार विलास जगताप (नाशिक) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री श्री. राणे यांनी सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेत कामाच्या प्रत्येक टप्प्याबाबत माहिती जाणून घेतली. नागरिकांना अखंड, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कामामुळे सुरू असलेले खोदकाम, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून घडणारे अपघात ही गंभीर बाब असल्याने काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. कामात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी मक्तेदारांना दिल्या.
प्रकल्पाची गती वाढविण्यासाठी अतिरिक्त साईट इंजिनिअरची तातडीने नियुक्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मनुष्यबळ वाढवून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
याशिवाय, जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पाहणी करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा आणि कामाच्या गुणवत्तेसह प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. राणे यांनी दिल्या.
सावंतवाडी शहरातील नागरिकांना भविष्यात सक्षम व विश्वासार्ह पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून, संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देशही पालकमंत्री श्री. राणे यांनी यावेळी दिले.
