कुणकेश्वर ग्रामसभेत अणुऊर्जा व तत्सम विनाशकारी प्रकल्पांना एकमुखी विरोध
ग्रामसभेत विरोधाचा ठराव मंजूर; लोकभावनेचा आदर करून परिसरात कोणताही विनाशकारी प्रकल्प न उभारण्याची मागणी
कुणकेश्वर
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवारी (दि. ६ जुलै) दुपारी ३ वाजता कुणकेश्वर मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या ग्रामसभेत अणुऊर्जा प्रकल्पासह परिसरात प्रस्तावित होऊ शकणाऱ्या कोणत्याही तत्सम विनाशकारी प्रकल्पांना ग्रामस्थांनी एकमुखाने विरोध दर्शविला. यासंदर्भातील ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी कुणकेश्वर परिसराचे धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय तसेच पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व अधोरेखित करत अणुऊर्जा किंवा इतर विनाशकारी प्रकल्पांमुळे नैसर्गिक पर्यावरण, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकल्पाला ग्रामस्थांचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, सरपंच महेश ताम्हणकर, ग्रामसेवक गुणवंत पाटील, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय आचरेकर यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेतील सर्व उपस्थितांनी एकमताने ठराव मंजूर करत, कुणकेश्वर परिसरात अणुऊर्जा तसेच पर्यावरण आणि जनजीवनाला धोका निर्माण करणारे कोणतेही प्रकल्प राबविण्यात येऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ग्रामस्थांच्या भावना आणि लोकमताचा आदर करून शासनाने अशा प्रकल्पांचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
