You are currently viewing नवसरणी येथे नळपाणी योजनेच्या कामाचा निष्काळजीपणा; कार थेट गटारात कलंडली

नवसरणी येथे नळपाणी योजनेच्या कामाचा निष्काळजीपणा; कार थेट गटारात कलंडली

नवसरणी येथे नळपाणी योजनेच्या कामाचा निष्काळजीपणा; कार थेट गटारात कलंडली

रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली, चार अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप

सावंतवाडी

येथील नवसरणी परिसराजवळ नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रविवारी सकाळी रस्त्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी कार थेट गटारात कलंडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून गटारात अडकलेली कार सुखरूप बाहेर काढण्यात आली.
दरम्यान, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याच ठिकाणी यापूर्वीही सुमारे चार अपघात घडले आहेत. शहरात विविध ठिकाणी नळपाणी योजनेसाठी खोदकाम करून रस्ते अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आवश्यक सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, धोकादायक ठिकाणी योग्य सूचना फलक व बॅरिकेड्स उभारावेत तसेच रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा