उद्योजकांना सुवर्णसंधी
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना
सिंधुदुर्गनगरी समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. 1 लाखची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणा-या लाभार्थींना व्याज नाही) व 25 टक्के बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.15 लाखापर्यंत पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 ते 50 लाखापर्यंत) या योजनांचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना (भौतिक उद्दीष्ट – 60) व 25 टक्के बीज भांडवल योजना (भौतिक उद्दीष्ट – 8) या योजनांचे अर्ज वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) या कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत.
रुपये 1 लाख थेट कर्ज योजना :- लाभार्थींना सदर कर्ज महामंडळातर्फे दिले जाते कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्ष आहे अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. कर्जाचा दरमहा मासिक हप्ता 2 हजार 85 रुपये असेल.
25 टक्के बीज भांडवल योजना :- कर्जाची उच्चतम मर्यादा रु.5 लाख पर्यंत. कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 50 वर्षे आहे. बँकमार्फत लाभार्थींना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग 25 टक्के, सहभाग असून महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर व्याजाचा 4 टक्के दराने कर्जाची परतफेड करावयाची आहे.
या योजनांसाठी पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला.(ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 1 लाख), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (विजाभज व वि.म.प्र.), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/ नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमती पत्र व व्यवसायाच्या जागेचा ॲसेसमंट उतार ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट – 52) व गट कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट- 01) या योजनांकरिता महामंडळाच्या www.vnvjntdc.org या संकेत स्थळाला भेट देवून ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रुपये 15 लाखापर्यंत ) :- ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रुपये 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंग बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी 5 वर्ष असून योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लाखापर्यंत. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.vnvjntdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
गट कर्ज व्याज परतावा योजना(भौतिक उद्दीष्ट – 7) (रु. 10 ते 50 लाखापर्यंत) :- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतीतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारण्याकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 8 लाख पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रुपये 10 ते रु. 50 लाखापर्यंत मंजुर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. परतफेडीचा कालावधी – मंजूर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो. कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यानंतर (12 टक्के मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vnvjntdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
तरी इच्छूक, गरजू विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या योजनांच्या अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,अ विंग, 1 ला मजला ,सिंधुदुर्गनगरी, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग या पत्यावर व ई-मेल: dmvnvjntsindhu@gmail.com दूरध्वनी क्र. 02362-228156 यावर संपर्क साधावा.
