नडगीवे घरफोडी प्रकरणाचा उलगडा; ‘KTM नानावत गँग’चा मुख्य आरोपी जेरबंद
महाराष्ट्र-कर्नाटकातील ३० हून अधिक घरफोड्यांचा संशय; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पुण्यात धडक कारवाई, इतर साथीदारांचा शोध सुरू
कणकवली :
खारेपाटण-नडगीवे येथील घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश आले आहे. या प्रकरणातील कुख्यात **’KTM नानावत गँग’**चा मुख्य आरोपी परदुम सिलोन नानावत (वय २९, रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३० हून अधिक घरफोडीचे गुन्हे केल्याचा संशय त्याच्यावर असून या कारवाईमुळे नडगीवे परिसरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दरम्यान, टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नडगीवे गावचे पोलीस पाटील जितेंद्र चंद्रकांत मण्यार यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, धुरीभाटलेवाडी परिसरातील सहा बंद घरांचे कडीकोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वानपथक आणि अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात संदीप पांडुरंग मांजरेकर यांच्या घरातून १० हजारांची रोख रक्कम व सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास सुरू ठेवत गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. तपासादरम्यान या घरफोडीमागे ‘KTM नानावत गँग’ कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील यवत पोलिस ठाणे हद्दीतील कुसेगाव-पडवी परिसरात सापळा रचून रविवारी (२९ जून) परदुम नानावत याला शिताफीने ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पोलिस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅकसन घोणसालविस तसेच पोलिस शिपाई ऋषिकेश टोपले आणि अमर कांडर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून आरोपीकडून आणखी काही घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
