भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्गच्यावतीने मागणी
वेंगुर्ला
वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारी यांची सोय करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष अनंत उर्फ दादा केळुसकर यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रकाश सागवेकर, रोहन मोर्जे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, गेले एक वर्ष नगरपरिषदेच्यावतीने मानसीश्वर गार्डन नजिक मच्छीविक्रेत्या महिलांसाठी मार्केटची सोय उपलब्ध करुन महिलांना दिलासा दिला आहे. परंतु, त्या ठिकाणी मच्छीविक्रेत्या महिला तसेच मच्छी खरेदी करणारे ग्राहक यांना त्या ठिकाणी शौचालय तसेच मुतारी याची कमतरता भासत आहे. त्यामुळे मच्छीविक्रेत्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तरी आपल्याकडील फिरते शौचालय किंवा तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था करून देऊन सर्व मच्छीविक्रेत्या महिला तसेच मच्छि खरेदी करणारे ग्राहक यांची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी येत्या २ दिवसात सदर जागी शौचालय, मुतारीची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.