डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेच्या मूल्यांचा विद्यार्थ्यांना दिला प्रेरणादायी संदेश
चिपळूण :
डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. कांबळे सर यांनी आपल्या मनोगतात राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, स्त्रीशिक्षण तसेच वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि मानवतेची मूल्ये आपल्या जीवनात जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात प्रा. संदीप येलये यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त करत सामाजिक न्यायाची संकल्पना आणि शाहू महाराजांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया चौघुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. सुरभी जाधव यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
