माजगाव येथे ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन; शिक्षण, आरोग्य व समाजकार्यातील योगदानाला मानाचा मुजरा
सावंतवाडी | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा लोकनेते कै. ना. भाईसाहेब सावंत यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथील त्यांच्या समाधिस्थळावर भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. भाईसाहेब यांचे नातू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो चाहत्यांनी समाधिस्थळ व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना विक्रांत सावंत म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व कृषी क्षेत्राला आपल्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भाईसाहेब सावंत आजही जनमानसात आदराने स्मरणात आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातून पुढे येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर हजारो सामान्य लोकांचे आयुष्य उज्ज्वल केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, अण्णा सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सदस्य सतीश बागवे, संचालक संदीप राणे, सदस्य श्रीमती वसुधा मुळीक, माजी मुख्याध्यापक श्रीमती सोनाली सावंत, के. टी. परब, बाळासाहेब पाटील, जगदीश धोंड, श्री. बोडके, शैलेश नाईक, पी. एम. सावंत, धीरेंद्र जाधव होळीकर, ॲड. शामराव सावंत, एन. ए. देवकर, रविंद्र म्हापसेकर, संजय कानसे, प्रसाद सावंत, आबा सावंत, आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. सुमेधा नाईक धुरी, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्रभारी उपप्राचार्य श्री. ईश्वरी कांबळे तसेच दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तसेच राणी पार्वतीदेवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजगाव येथील समाधिस्थळी उपस्थित राहून कै. ना. भाईसाहेब सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच चौकुळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पुण्यतिथीनिमित्त भाईसाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण आदरांजली वाहिली.
