बांदा
न्यू इंग्लिश स्कूल मडुरा शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी रोटरी क्लब पुणे तर्फे समीहन पांगम व भूषण पांगम यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेला पन्नास पुस्तके प्रदान करण्यात आली. हायस्कुलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर समन्वय समिती तथा शालेय समिती सदस्य भिकाजी धुरी, भूषण पांगम, मुख्याध्यापक सदाशिव गवस, ज्येष्ठ शिक्षक श्री. वराडकर, श्री. सावंत, ग्रंथपाल प्रतिभा सावंत आणि इयत्ता नववीचे विद्यार्थी उपस्थित होते. जर्मन सरकारचा परदेशी व्यक्तीसाठी असलेला क्रॉस ऑर्डर ऑफ मेरीट हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉ. अरविंद नातू यांनी जागतिक पातळीवर देखील आपला ठसा उमटवला असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी म्हणून ते कायम प्रयत्नशील असतात. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युरेका सायन्स क्लब तसेच ज्ञानाश्रम हायस्कूलद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध ऑनलाईन वेबिनार मध्ये ते उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, असे मान्यवरांनी सांगितले. डॉ. अरविंद नातू यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्गातील एकूण 14 शाळांना प्रत्येकी पन्नास पुस्तके रोटरी क्लब पुणे तर्फे देण्यात येणार असून काही शाळांना अगोदरच ती वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी भूषण पांगम यांनी आपल्या विशेष भाषण शैलीतून विद्यार्थ्यांना बहूमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रशाळेचे मुख्याध्यापक सदाशिव गवस यांनी प्रास्ताविक, अध्यक्षीय भाषण श्री. धुरी सर, सुत्रसंचलन श्री. सावंत एस्.एन. यानी केले. शेवटी उपस्थितांचे आणि डॉ. अरविंद नातू, रोटरी क्लब पुणेचे आभार मानले.