मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

किनाऱ्यावर दोन ते अडीच मीटर उंचीच्या लाटा उठण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरी : 
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनांनुसार दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.
आजपासून दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या सखल भागात जास्त करून मालवण व मुणगे परिसरात लाटांचा जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्रात सुमारे 1.8 ते 2.4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तरी त्या अनुषंगाने किनारपट्टीच्या भागात विशेष दक्षता घेण्यात यावी.
किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने नौका किनाऱ्याजवळ न नांगरता सुरक्षीत ठिकाणी ठेवाव्यात, नांगरलेल्या बोटी एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात, या कालावधीत समुद्रात कोणत्याही जलक्रीडा प्रकार सुरू ठेवू नयेत, बोटींचे समुद्रात येणे-जाणे टाळावे, खुल्या समुद्रात याचा प्रभाव कमी जाणवेल पण किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळतील. कोणतीही अनुचित घटना घडल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष (02362) – 228847 किंवा 1077, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (02362) 228614, तहसील मालवण नियंत्रण कक्ष (02365) 252045, देवगड तहसिल नियंत्रण कक्ष – (02364) 262204, वेंगुर्ला तहसिल नियंत्रण कक्ष (02366) 262053, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण (02365) 252007 येथे संपर्क साधावा असे आवाहन शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा