You are currently viewing विश्वकल्याणाची प्रार्थना
Oplus_16908288

विश्वकल्याणाची प्रार्थना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा पारिजात साहित्य समूहाच्या सन्मा.सदस्य कवयित्री अनिसा सिकंदर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विश्वकल्याणाची प्रार्थना*

 

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥धृ.॥

 

द्वेषाच्या भिंती कोसळून, प्रेमाचे पूल उभे राहू दे,

मैत्रीच्या या सुंदर वाटेवर सारे जग चालू दे।

जात-पात अन् धर्मभेदांचे काळे ढग विरून जाऊ दे,

एकतेच्या इंद्रधनुष्यातून नवे विश्व फुलू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥१॥

 

 

कोणीही भुकेला राहू नये, कोणी अश्रू ढाळू नये,

दुःखाच्या प्रत्येक सावलीत आशेचा दीप उजळू दे।

अश्रूंच्या प्रत्येक थेंबाला हसरे मोती लाभू दे,

निराधारांच्या जीवनात सुखाचे फूल फुलू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥२॥

 

 

आई-वडिलांचा मान वाढू दे, सेवा त्यांची घडू दे,

त्यांच्या पवित्र चरणी कृतज्ञतेचे फूल पडू दे।

घराघरातून प्रेम, जिव्हाळा, संस्कारांचा सुगंध दरवळू दे,

प्रत्येक कुटुंब आनंदाने नांदत राहू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥३॥

 

 

वेळेवरती पाऊस पडू दे, शेत हिरवेगार बहरू दे,

कष्टकरीच्या घामामधुनी सोन्यासारखे पीक येऊ दे।

दुष्काळ, पूर, वादळांची संकटे दूर निघून जाऊ दे,

निसर्गाच्या प्रत्येक रूपातून मंगल गीत झरू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥४॥

 

 

युद्धाची भाषा थांबू दे, मैत्रीची भाषा बोलू दे,

शांततेच्या शुभ संदेशाने सारे जग नटू दे।

हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती हातामध्ये हात देऊ दे,

मानवतेच्या एका धाग्यात सारे जग गुंफू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥५॥

 

 

सर्व प्राणी सुखी होवोत, सर्व जीव निरोगी राहू दे,

प्रत्येक चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलू दे।

सत्य, दया, करुणा, ममता प्रत्येक हृदयात नांदू दे,

माणुसकीच्या या सुंदर बागेत प्रेमफुले उमलू दे॥

हे अल्लाहा, हे ईश्वरा, सर्वांचे कल्याण होऊ दे,

अवघे विश्व प्रेम, शांती, समृद्धीने भरू दे॥६॥

 

(आमीन! तथास्तु!)

 

*अनिसा सिकंदर, दौंड*

९२७००५५६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा