समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन
खारेपाटण / प्रतिनिधी :
“विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःमधील उपजत गुण आणि कला-कौशल्यांचा योग्य वापर करून आपली प्रगती साधावी,” असे प्रेरणादायी प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रुहिता तांबे यांनी केले. खारेपाटण हायस्कूल येथे यश कॉम्प्युटर अकॅडमी व शिवसेना पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल पर्यवेक्षक संतोष राऊत, ॲड. विशाल जाधव, खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रह्मदंडे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. गुरसाळे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, संगणक शिक्षिका फरीदा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात समाज कल्याण सभापती रुहिता तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्ष आणि यश कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचक्रोशीतील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी सांगितले की, पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यातील पहिला AI जिल्हा म्हणून घोषित करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या गौरवातून साजरा करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण जि. प. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांची सेवा निवृत्ती होत असल्याने त्यांचाही रुहिता तांबे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका दर्शना पाताडे यांनी केले.
