You are currently viewing मराठा करिअर अकॅडमीची उत्तुंग यशाची गवसणी

मराठा करिअर अकॅडमीची उत्तुंग यशाची गवसणी

पोलीस व अग्निवीर भरतीत 12 विद्यार्थ्यांची निवड

सावंतवाडी : मराठा करिअर अकॅडमी, सावंतवाडीने अल्पावधीतच घवघवीत यश संपादन करत पोलीस व अग्निवीर भरतीमध्ये एकूण 12 विद्यार्थ्यांची निवड घडवून आणली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निकालात अकॅडमीच्या 8 विद्यार्थ्यांनी यश मिळवत पोलीस दलात स्थान मिळवले आहे.

यामध्ये आदिती सावंत (ठाणे शहर पोलीस), विलास वाक्षे (मीरा-भाईंदर पोलीस), संभाजी वारे (मीरा-भाईंदर पोलीस), प्रतीक्षा गावडे (मुंबई पोलीस), तन्वी गावडे (मुंबई पोलीस), तेजस्विनी गावडे (मुंबई पोलीस), अनिशा पालयेकर (मुंबई पोलीस) आणि मयुरी गावडे (मुंबई पोलीस) यांचा समावेश आहे.

तसेच मंथन कांबळे, प्रणव भालेकर, कौशल देसाई आणि बाळा सावंत या चार विद्यार्थ्यांची अग्निवीर पदासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, पालकांनी पाहिलेले स्वप्न आणि अकॅडमीचे संचालक बापू परब यांनी केलेले योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केले असून एकाच वेळी 12 विद्यार्थ्यांची निवड होणे ही सावंतवाडी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक तसेच विविध स्तरांतून मराठा करिअर अकॅडमीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सावंतवाडी तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस व अग्निवीर भरतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मराठा करिअर अकॅडमीने स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा