You are currently viewing कणकवलीत अतिक्रमणाविरोधात नगरपंचायतीची मोहीम सुरू

कणकवलीत अतिक्रमणाविरोधात नगरपंचायतीची मोहीम सुरू

कणकवलीत अतिक्रमणाविरोधात नगरपंचायतीची मोहीम सुरू

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाहणी; विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना

कणकवली

शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईची तयारी सुरू केली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी करत विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना दिल्या.
सर्वप्रथम मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्टॉलधारकांना त्यांच्या हद्दीबाहेर ठेवलेले स्टॉल, साहित्य व इतर अडथळे तत्काळ हटविण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पथकाने मुंबई–गोवा महामार्गावरील उड्डाणपूलाखालील परिसराची पाहणी केली. येथेही विक्रेत्यांना अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले.
काही ठिकाणी शाब्दिक वाद
पाहणीदरम्यान काही स्टॉलधारक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. मात्र मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेत संबंधितांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या.
पर्यायी जागेची विक्रेत्यांची मागणी
दरम्यान, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला विरोध नसल्याचे स्पष्ट करत भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिणे यांनी विक्रेत्यांसाठी पर्यायी व हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
कारवाई कधी होणार?
सध्या नगरपंचायतीकडून विक्रेत्यांना सूचना आणि इशारे दिले जात असले तरी प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव मोहीम नेमकी कधी राबविली जाणार, याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. नगरपंचायत प्रशासन केवळ इशारे देणार की प्रत्यक्ष कारवाई करणार, याकडे आता नागरिकांसह विक्रेत्यांचेही लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा