You are currently viewing कारिवडेत वीज खांबावर काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्याला शॉक

कारिवडेत वीज खांबावर काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्याला शॉक

कारिवडेत वीज खांबावर काम करताना कंत्राटी कर्मचाऱ्याला शॉक

प्रज्योत नाईक खांबावरून खाली कोसळले; ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली, प्रकृती स्थिर

सावंतवाडी :

तालुक्यातील कारिवडे येथे विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा तीव्र धक्का बसल्याची घटना घडली. शॉक लागल्याने संबंधित कर्मचारी थेट जमिनीवर कोसळला. प्रज्योत नाईक असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून सुदैवाने ते या गंभीर प्रसंगातून बचावले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्योत नाईक हे महावितरणच्या कंत्राटी सेवेत कार्यरत असून कारिवडे गावात विद्युत दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खांबावरून खाली पडले. ही घटना पाहताच परिसरातील ग्रामस्थ आणि सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.
उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार
जखमी प्रज्योत नाईक यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर आणि परिचारिका यांनी त्वरित वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार सुरू केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे कोणतीही गंभीर दुखापत टळली असून त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अधिकाऱ्यांकडून विचारपूस
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी प्रज्योत नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच ‘जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजू मसूरकर यांनीही रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार करण्याची विनंती केली.
या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, प्रज्योत नाईक यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याने कुटुंबीय, सहकारी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा