You are currently viewing आधी त्रुटींची पूर्तता करा, नंतरच विमानतळाचा मुहूर्त ठरवा – परशुराम उपरकर

आधी त्रुटींची पूर्तता करा, नंतरच विमानतळाचा मुहूर्त ठरवा – परशुराम उपरकर

चिपी विमानतळासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय आवश्यक…

कणकवली

चिपी येथील विमानतळ सुरू करण्यात विलंब होत असलेल्या त्रुटींची आधी पूर्तता करा, नंतरच विमानतळ उद्घाटनाचे मुहूर्त ठरवा अशी टीका मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज केली.
विमानतळ तातडीने सुरू करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्यात समन्वय घडवून आणणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तसे न करता श्री.राऊत हे वारंवार उद्घाटनाच्या तारखा जाहीर करून इथल्या जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही श्री.उपरकर म्हणाले. त्यांनी येथील आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
श्री.उपरकर म्हणाले, २२ वर्षापूर्वी चिपी विमानतळाचे भूमिपूजन झाले. तर गेल्या सहा महिन्यात खासदार श्री. राऊत यांनी तीन वेळा विमानतळ उद्घाटनाच्या तारखा जाहीर केल्या. मात्र विमानतळ सुरू होण्यासाठी आलेल्या केंद्रीय वाहतूक निर्देशालय समितीने अजूनही त्रुटी काढल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत विमानतळ सुरू करता येणार नाही.
चिपी विमानतळासाठी अजूनही पाणी, वीज आणि प्रशस्त रस्ते यांची व्यवस्था झालेलीे नाहीत. त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा विमानतळ सुरू करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी केली आहे. आता जनतेला घोषणा नको आहेत. आपापसात टीका करण्यापेक्षा खासदारांनी विमानतळ कसा सुरू होईल यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा