संत सोहिरोबानाथ मंदिर–इन्सुली हायस्कूल मार्गावर सुरक्षा उपाययोजनांची मागणी
अपघातांचा धोका वाढल्याने रंबलिंग पट्टे व वाहतूक नियंत्रण उपाय तातडीने राबवावेत : नितीन राऊळ
बांदा :
जुन्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संत सोहिरोबानाथ मंदिर ते इन्सुली हायस्कूल दरम्यानच्या दोन्ही बाजूंच्या सर्विस रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने रंबलिंग पट्टे बसवून इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, संत सोहिरोबानाथ मंदिर व इन्सुली हायस्कूल परिसरातील सर्विस रोडवर पादचारी, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. मात्र, दोन्ही बाजूंनी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या भागातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी सर्विस रोडच्या दोन्ही बाजूंना रंबलिंग पट्टे बसविणे, आवश्यक वाहतूक सूचना फलक उभारणे तसेच अन्य सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यक कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी नितीन राऊळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
