हॉटेल मॅनेजमेंट तृतीय वर्षाच्या निकालात विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; संजना गावडे द्वितीय तर राजन सावंत तृतीय
कुडाळ / साळगाव (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या साळगाव येथील जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट) ने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या तृतीय वर्षाच्या निकालात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडत यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या निकालात कु. साक्षी संतोष परब हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या तृतीय वर्षाच्या निकालात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये साक्षी परब हिने प्रथम क्रमांक मिळवला असून, कु. संजना सुरेश गावडे हिने द्वितीय क्रमांक तर राजन रत्नाकर सावंत याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
हॉटेल मॅनेजमेंटसारख्या स्पर्धात्मक आणि व्यावसायिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी महाविद्यालयाच्या दर्जेदार शिक्षणाची साक्ष देणारी ठरली आहे. विशेषतः मुलींनी मिळवलेले यश हे या क्षेत्रात महिलाही तितक्याच सक्षमपणे आपले स्थान निर्माण करू शकतात, हे अधोरेखित करणारे आहे.
या घवघवीत यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, प्रवीण प्रभूकेळुस्कर, महाविद्यालयाचे प्राचार्य अमेय महाजन तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
या यशामुळे जयहिंद कॉलेज ऑफ सायन्सने जिल्ह्यातील हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेची गुणवत्ता आणि बांधिलकी सिद्ध केली आहे.
