नुकत्याच संपन्न झालेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस अंतर्गत वलगावच्या शिकची रिसॉर्ट मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरातील सर्व 129 शिबिरार्थींनी व मिशन आय एएसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. जिल्हाधिकारी श्री आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन केले होते. शिबिरार्थींनी जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष निवासी उपजिल्हाधिकारी यांचा कक्ष नियोजन भवन या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना कोण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिशनचे संचालक व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे हे होते. याप्रसंगी श्री रविराज देशमुख श्री मुनीराज कुथे श्री शंकर पत्रे श्री शांतीलाल महाजन श्रीमती विद्या काठोळे प्रा. पल्लवी येरुळकर श्री संजय काशीवार श्री गुलवाडे श्री हरीश यावले डॉ. हेमंत उर्फ बाळू भाऊ देशमुख श्री नंदकिशोर खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. या कार्यक्रमात श्रीमती वर्षा भाकरे यांच्या व्यतिरिक्त प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे श्री रविराज देशमुख श्रीमती तेजस्विनी वानखडे यांनीही विद्यार्थ्यांना उदबोधन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी वातावरण तयार झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री संतोष काकडे यांनी पुढाकार घेतला .
जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सर्व शिबिरार्थींना जलपान करण्यात आले. नियोजन भवनातून बाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय पाहिल्याचे समाधान दिसून येत होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यानंतर पोलीस आयुक्तालय या ठिकाणी भेटी दिल्यात. आयुक्तालयात पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मला आयपीएस होण्यासाठी चार वेळा परीक्षा द्यावी लागली तुम्ही जर आतापासून प्रयत्न करीत आहात तर तुम्ही यशाचे मानकरी अल्पावधीमध्ये होऊ शकता असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या शिबिराचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व त्रिवेणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते
