You are currently viewing भाई देऊलकर यांच्या पाठपुराव्याला यश; तहसीलदार कार्यालय परिसराचे होणार सुशोभीकरण

भाई देऊलकर यांच्या पाठपुराव्याला यश; तहसीलदार कार्यालय परिसराचे होणार सुशोभीकरण

भाई देऊलकर यांच्या पाठपुराव्याला यश; तहसीलदार कार्यालय परिसराचे होणार सुशोभीकरण

रंगरंगोटी, संरक्षण भिंत व गार्डन उभारणीचे काम सुरू; तहसीलदार श्रीपाद पाटील यांचे अभिनंदन

सावंतवाडी :

सामाजिक कार्यकर्ते तथा सिंधुसागर पर्यटन प्रबोधिनीचे संस्थापक वासुदेव सहदेव उर्फ भाई देऊलकर यांच्या विनंती निवेदनानुसार सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. तहसीलदार कार्यालय इमारतीची रंगरंगोटी सुरू असून कार्यालयासमोरील संरक्षण भिंत व गार्डनही लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी दिली.

भाई देऊलकर हे ज्येष्ठ आंदोलनात्मक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. प्रभावी वक्तृत्व, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय मानली जाते. मागील वर्षी त्यांनी देहदानाची घोषणा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला होता.

तहसीलदार कार्यालय परिसराची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार श्रीपाद पाटील यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात कार्यालय इमारतीची रंगरंगोटी तसेच समोर गार्डन उभारण्याची मागणी करण्यात आली होती. तहसीलदार श्रीपाद पाटील यांनी या मागणीचा सकारात्मक पाठपुरवठा करत कामाला गती दिली.

या कामाची दखल घेत भाई देऊलकर यांनी तहसीलदार श्रीपाद पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव तसेच कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा