*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधा गर्दे लिखित अप्रतिम लेख*
*आईस्क्रीम*
आपण खूप मस्त पदार्थांचा आस्वाद घेतो. गुलाबजाम, वडापाव, पानी पुरी,पोळीचे लाडू,मेगी, पोहे आणि माहित नाही किती पदार्थ आपण चवी चवीने चाखतो. हे सगळे पदार्थ माझ्या आवडीचेच आहेत. पण मी खरं सांगू का? मी की नाही खवैय्या जातीतील. त्यामुळे सगळे पदार्थ खायला कधी ही एका पायावर नव्हें तर करंगळी वर उभी असते(बिच्चारी करंगळी नुसत्या कल्पनेनेच बेशुद्ध झाली असेल.)
पण तरी ही मला सदा सर्वदा तिन्ही त्रिकाळ आवडणारा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम.
अहाहा… नुसतं नाव घेतलं तरी मस्त गार गार वाटायला लागलं. मला वाटतं डायटचा विचार नाही केला,कॅलोरीज नाही मोजल्या तर एकूण एक लोकांना हा पदार्थ आवडतो. आबाल वृद्ध सगळ्यांना आवडणारं. हो की नाही?
कोणी ही, कधीही,कितीही, कसलंही आईस्क्रीम दिलं तरी खायला तयार. मन कधी भरतच नाही. आणखी “आता नको” हे ही तोंडातून निघत नाही. अगदी तुडुंब पोट भरलं असेल आणि जर कोणी विचारलं
“आईस्क्रीम चालेल का?”
की लगेच डोळे लुकलुकायला लागतात, तोंडाला पाणी सुटतं आणि थंडगार आईस्क्रीमचा स्वाद घ्यायला मन धाव घेतं.
अहो किती प्रकार त्यात?
व्हॅनिला, मेंगो, स्ट्रॉबेरी, चॉकलेट,कॉफी,पिस्ता, रोस्टेड ऑलमंड, जॅकफ्रूट, पेरु,सीताफळ,अंजीर,बटर स्कॉच, लीची, संत्र,फालूदा कसाटा ..आणि आणि किती तरी प्रकार. मला काही न माहित असलेले आणि काही आठवणीत नसलेले.
मला आठवतंय, माझ्या आतेबहिणीचं केळवण होतं . आजी म्हणाली ह्यावेळेस साधं जेवण आणि पोटभर आईस्क्रीम हा बेत. मग काय..
भरपूर दूध घेतलं गेलं.भरपूर आठवलं गेलं. त्यात वेलची घातली, आणि गार करायला ठेवलं.आईस्क्रीम करण्याचं मशीन आणलं त्याच्या भोवती घालायला मीठ आणि बर्फ आणला. बर्फ गोणपाटात घट्ट लपेटून ठेवला होता. हव तेव्हा हवा तेवढाच काढून परत गच्च दाबून ठेवायचा. आमच्या पोरासोरांची ड्यूटी लागली “.फिरवा रे जोरात गोल गोल.”
आम्ही ही डोळे मिटून,ओठ गच्च दाबून पूर्ण ताकदीने फिरवत होतो. एका नंतर एक एक आईस्क्रीम पॉट रिकामे होत होते. किती तरी वर्ष गेली पण त्या आईस्क्रीमचा स्वाद अजून ही जिभेवर रेंगाळतो आहे.
आता मी घरीच आईस्क्रीम करायला लागल्या पासून तर “अपने हाथ जगन्नाथ.” हा प्रकार झाला आहे. त्यात ओरियो बिस्किटांचे आईस्क्रीम ही करते.
अहो हे आईस्क्रीम वाटतं तितका साधा प्रकार नाही हं. अत्यंत महागडं आईस्क्रीम ही असतं. आपण साधारण माणसं घेऊ शकत नाही इतकं महाग.
जगातल्या सात सगळ्यात महागड्या आईस्क्रीम बद्दल मी वाचलं होतं ते इथे शेयर करते. हे वाचूनच डोळे फिरायची वेळ आली होती.
1 : स्ट्राॅबेरी अरनाड…..ह्याची किंमत 1.4 मिलियन डॉलर आहे. ह्यात इतर महागड्या वस्तूं बरोबर 7.9 कॅरेटच्या हिऱ्या अंगठीची स्ट्रॉबेरी वर सजावट करतात.
2: एब्सर्डिटी सुंदे……60,000 डॉलरचं हे आईस्क्रीम. ह्या आईस्क्रीम बरोबर एक टी शर्ट, तंजानियाच्या फाईव स्टाॅर हाॅटेल मधे थांबायची सोय आणि त्याच बरोबर एक first class चं तिकिट ही स्मृती चिन्ह म्हणून देतात.
3: फ्रोजन चाॅकलेट हाऊते…. न्यूयॉर्कच्या एका लोकप्रिय आउटलेट ने ह्याची सुरवात केली.त्यांच्या ह्या आईस्क्रीम ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे रिकॉर्ड बनविला.ह्यात 23 कॅरेटचं 5 ग्रॅम सोनं असतं. ह्याला क्लासिक गोबलेट आणि सोन्याच्या चमच्या सोबत सर्व करतात. किंमत 25000 डॉलर आहे. पण गंमत म्हणजे आपल्याला एक 18 कॅरेटचं ब्रेसलेट ही मिळेल.
4: थ्री ट्विन्स आईस सुंदे….3,333,33 डॉलर किंमत असलेलं हे आईस्क्रीम, अनेक दुर्मिळ वाईन ने तयार करतात आणि 1850 सालच्या एंटीक अशा चमच्या सोबत सर्व करतात.
5: द ब्लैक डायमंड…..ह्याचा आस्वाद घ्यायला दुबईला जावं लागेल.स्कूपी कैफे 817 डॉलरला मिळणाऱ्या ह्या आईस्क्रीम मधे ब्लैक ट्रफल, केशर बेस 23 कॅरेट सोन्याच्या पानाचा वापर करतात.
6: द विक्टोरिया…. व्हिक्टोरिया हॉटेलच्या पवेलियन रेस्ट्रां मधे सोन्याचे पान आणि सोन्याचा भुगा ( कण,धूळ) मिळवून तयार केलं जातं. ह्याची किंमत 1000 डॉलर आहे.
7: ट्रफल आईस्क्रीम….लास वेगासच्या ए.आर.आई.ए. रिजार्ट एंड कसीनो मधे शेफ मासा ताकायामाने तयार केलेल्या ह्या आईस्क्रीमची किंमत 95 डॉलर आहे.ह्यात सोन्याच्या पानाने सजावट करतात आणि एका विशिष्ट ग्लास मधे सर्व करतात.
ही माहिती म्हणून ठीक आहे ,पण आपलं साधं आईस्क्रीम जागत लई भारी,त्याची चव ही न्यारी.
चला तर खाऊया…..…
राधा गर्दे
कोल्हापूर
