You are currently viewing प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडीतील किंगमेकर मैदानात…

प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडीतील किंगमेकर मैदानात…

सावंतवाडीत सत्ता संघर्ष अटळ

विशेष संपादकीय….

मागील २३ वर्षे दीपक केसरकर आणि सावंतवाडीत नगरपालिका हे नाते अगदी “फेविकॉल का मजबूत जोड” सारखे घट्ट होते. केसरकर नगराध्यक्ष पदावरून आमदार झाले, पल्लवी केसरकर, आनारोजीन लोबो, श्वेता शिरोडकर, बबन साळगावकर असे नगराध्यक्ष बदलले, परंतु केसरकरांची सावंतवाडी पालिकेवरील पकड कधीही ढिली पडली नव्हती. शहरवासीयांचा अतूट विश्वास, केसरकारांनी शहराचा केलेला कायापालट आणि भ्रष्टाचार विरहित कारभारामुळे लोकांनी डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास टाकला. परंतु बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना पालिका निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केसरकरांच्या पॅनल ला जोरदार टक्कर देत पुढील बदलाची नांदी दिली होती. परंतु वर्चस्वाच्या लढाईत बबन साळगावकर केसरकरांपासून दूर झाले आणि तिथेच पालिकेची सत्ता केसरकरांकडून गेली.
सत्ता बदल झाला तो नक्की लोकांनी केला की केसरकारांनी शहरवासीयांना बदल झाल्यावर काय काय घडतं याची झलक दाखविली? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण स्वतःची सत्ता असताना देखील केसरकर पालिकेच्या राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत ते आजपर्यंत अलिप्तच होते. सावंतवाडी शहराची एक संस्कृती होती. नगरपालिकेत शहरवासीयांना मान होता, त्यांचे म्हणणे नगराध्यक्ष देखील ऐकून घेत आणि योग्य ती कारवाई करत असत. शहर विकासात्मक दृष्ट्या प्रगती पथावर होते. वेगवेगळ्या योजना शहरात राबविल्या जात होत्या. बऱ्याचदा केसरकरांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत होता, परंतु शांत संयमी म्हणून ओळख असणारे केसरकर शहरवासियांच्या विश्वासावर विरोधकांना पुरून उरत होते. सुसंस्कृत सावंतवाडीत कधीही दादागिरीची भाषा ऐकावयास येत नव्हती, आणि दादागिरी खपवूनही घेतली जात नव्हती. परंतु ज्यांना वर्षानुवर्षे सांभाळले त्यांनीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर घात केला आणि केसरकरांची एकहाती असलेली सत्ता गेली याचं शल्य केसरकरांना बोचत राहिले, त्यामुळे गेले वर्षभर निवडणुकीत ज्यांना शहराने साथ दिली ते किती विकास करतात, शहरवासीयांना काय काय सुविधा देतात याचं दुरूनच केसरकर यांनी दर्शन घेतलं. सत्ताधारी अपेक्षित असे काम न करता शहरात वादंग निर्माण करतात, शांत सुसंस्कृत शहराला अशांततेकडे घेऊन जातात असे निदर्शनास आल्यावर केसरकर यांनी पॅड बांधून पालिकेच्या मैदानात स्वतः ओपनिंगला उतरण्याची तयारी केली आणि येत्या आठ महिन्यानंतर होणाऱ्या सावंतवाडी पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची व्युहरचना आखण्यास सुरुवात केली.
भाजपा पालिकेत सत्तेत आली परंतु संजू परब यांच्यावर नितेश राणेंचा हात असणार अशी दरपोक्ती झालेली तेव्हा सावंतवाडीत आमूलाग्र बदल होतील अशी आशा होती. काहीच दिवसात सावंतवाडीत दिसणारे नितेश राणेंचे वर्चस्व जाऊन संजू परब हे आमदार रवींद्र यांच्या जास्त जवळ झाले आणि सावंतवाडीत होणारे कंटेनर थिएटर, भुयारी गटार, २४ तास पाणी अशा मोठमोठ्या घोषणा ह्या हवेत विरल्या. याउलट केसरकरांच्या काळात भाजी मार्केट साठी आलेला निधी देखील मागे गेला, भाजी मार्केटचा वाद तर इतका वाढला की भाजी मंडईतून त्यांना उठविल्यामुळे भाजीवाले भाजीमार्केटमध्ये बसण्यापेक्षा रस्त्यावर उतरले, पालिका आणि विक्रेते यांच्यात संघर्ष उभा राहिला. गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांच्या दुकानाचा प्रीमियम वाढविल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष उसळला. रवी जाधव सारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने तात्पुरता उभारलेला गाळा हटविल्याने पालिकेच्या विरोधात कित्येक दिवस आमरण उपोषण केले गेले, त्याला शहरवासीयांनी दिलेली साथ आणि सत्ताधार्यांनी केलेला दुर्लक्ष यामुळे सत्ताधाऱ्यांची मस्ती, दादागिरी शहरवासीयांनी फार जवळून पाहिली.
सावंतवाडीत स्थानिक व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारताना मात्र साटेलोटे करत परप्रांतीयांचे लाड पुरविण्याचे धोरण सत्ताधारी मंडळींनी सुरू ठेवले. सावंतवाडी बाजारपेठेतील जुन्या बस थांब्याची जागा आपलीच मालमत्ता असल्यासारखी विना लिलाव परप्रांतीय व्यक्तीस नाममात्र भाडे आकारत भाडेतत्त्वावर देण्यात आली. अशा अनेक वादग्रस्त निर्णयांवर विरोधकांकडून टीका देखील झाली. त्यामुळे पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासारखा निंदनीय प्रकार पहिल्यांदा घडला. “हम करे सो कायदा” या वृत्तीमुळे सावंतवाडीत विकासापेक्षा वादच जास्त झाल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.
केसरकरांची सत्ता असताना देखील माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो परखड मत मांडायच्या परंतु केसरकर सत्तेतून गेल्यावर मात्र पालिका सभागृहात स्वीकृत नगरसेवक परुळेकर वगळता कोणीही परखडपणे बोलताना दिसत नाहीत. केसरकरांच्या मागे त्यांच्याच नगरसेवकांची भूमिका गुलदस्त्यात असल्याचे पहावयास मिळाले. चांगल्या कामात विरोधकांनी देखील साथ दिली पाहिजे परंतु चुकीच्या कामच्यावेळी मात्र संघर्ष केला पाहिजे. परंतु गेले वर्षभर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये असा प्रयत्न सुद्धा होताना दिसला नाही. त्यामुळे सत्ताधारी पालिकेत मनमानी करतात अशी तक्रार आमदार केसरकर यांच्याकडे होत होती. त्याचाच परिणाम म्हणून रवी जाधव स्टॉल हटाव सारख्या प्रकरणात केसरकर यांनी मध्यस्ती करून मुख्याधिकाऱ्याना उच्च पातळीवरून ऑर्डर देत स्टॉल उभारण्यास भाग पाडले. शहराच्या विकासासाठी दिलेला निधी खर्च होत नसल्याने केसरकर यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात करून सावंतवाडी पालिकेच्या विकासासाठी आपणच निधी दिला हे सांगत पालिकेच्या कामात आपण लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे दाखवून दिले.
येत्या काहीच महिन्यात सावंतवाडी पालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे गेले वर्षभर सत्ता मिळून देखील सत्ताधारी पक्षाने दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता सावंतवाडी वासीयांची फसवणूक केली आहे. आकाशातील ताऱ्यांची स्वप्ने दाखवताना काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात फक्त डांबरची मलमपट्टी करत लोकांच्या डोळ्यात कशी धूळ फेकली, याचीही कारणीमिमांसा होताना दिसून येईल. २४ तास पाणी देऊ म्हणता म्हणता २ तास पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. पूर्वीचे सत्ताधारी शक्य असून करत नव्हते असे म्हणणारे आत्ताचे सत्ताधारी मात्र हात चोळतच बसले आहेत. प्रमुख नेत्यांमध्ये अनुभवाची कमी असल्याने पालिकेत नेहमीच पोरखेळ होताना दिसून आला. कोणताही निर्णय ठाम आणि विचाराने घेतलेला दिसत नसून आततायीपणाच जास्त होताना दिसतो. त्यामुळे केसरकर यांनी पुढील निवडणुकीचा विचार करत आतापासूनच आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात आपलीच सत्ता येणार यासाठी केसरकर प्रयत्नशील आहेत. नक्कीच केसरकरांवर कुरघोडीचा प्रयत्न भाजपा आणि संजू परब यांच्याकडून होणारच, परंतु केसरकर देखील राणेंना पुरून उरलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे भविष्यात सावंतवाडीत सत्ता-संघर्ष अटळ आहे. या संघर्षातून कोण बाजी मारणार हे येणारा काळच ठरवणार….!!

प्रतिक्रिया व्यक्त करा