सरपंच हेमंत मराठे यांची उपजिल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी
मळेवाड नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेली भातशेती व माड बागायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या नदीपात्रातील गाळ लवकरात लवकर काढा, या मागणीचे निवेदन सरपंच हेमंत मराठे यांनी उपजिल्हाधीकारी यांची भेट घेत दिले. या नदीपात्रालगत असलेल्या घरांनाही पाण्याचा वेढा पडतो. यामुळे जनजीवन विस्कळीत होते. गेली कित्येक वर्ष या नदीपात्रातील गाळ काढून मिळावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते निवृत्त शिक्षक वसंत राणे यांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे सरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हाधिकारी यांना गाळ काढण्यासंदर्भात निवेदन देऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांची भेट होऊ न शकल्याने उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची भेट घेऊन मळेवाड नदीपात्रातील गाळ काढणे संदर्भात चर्चा केली. यावेळी उपजिल्हाधिकारी साठे यांनी गाळ काढण्याबाबत ज्या कंपनीला काम देणार आहोत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.