काळाने ५ सप्टेंबरला आमच्यातुन हिरावून नेलं आणि त्याच्या कुटुंबियांसमवेतच आमचा सुंदरवाडी मित्रपरिवारही पोरका झाला.
रोज प्रत्येकाला दिवसाच्या व रात्रीच्याही शुभेच्छा देणारा, गृपवरचा ज्याचा वाढदिवस असेल त्या मित्र मैत्रिणींचे फोटो मिळवुन त्यावर कलाकुसर करीत वाढदिवसाचे बॅनर बनवुन व्हाॅटस ऍप व फेसबुकवर फडकवणारा हा आमचा प्रेमळ मित्र न सांगता गृप सोडुन गेला जगाच्या गृपवरून एक्झिट घेऊन.
आणि प्रत्येकजण त्याच्या आठवणीनीं गहिवरला.
गृपवर विचारांचा वाद घालणारा पण प्रत्येकाला कनेक्ट असणारा, दूरसंचार निगमच्या असंख्य लाईन्सचं मित्रपरिवाराचं जाळंच जणू त्याने विणलं होतं.
गृपवर ऍड झालेल्या नविन मेंबर्सची फोन करून बोलून स्वतः ओळख करून घेणारा असा हा विजय जगताप खरा दूरसंचार कर्मचारी शोभत होता स्वतःची प्रत्येकाशी कनेक्टिव्हिटी ठेवून.
राजकिय मते मात्र टोकाची असायची आणि एकदा भांडवलदारांविरूद्ध, खाजगिकरणाविरूद्व घेतलेली भुमिका तो लावून धरायचा वाद कितीही टोकाला गेला तरी.
“संजू हो टकलेर आपाटलो काय रे…?”
सध्याच्या सरकारी कंपन्या विकणे आणि सरकारचं व अदानी अंबानींचं समर्थन करणारी एखादी पोस्ट आली कि विजयचा फोनवर हा पहिला प्रश्र्न असायचा.
स्वतः तीस वर्षे कार्यरत असणारी बिएस्एन्एल् खाळखिळी करून तोटा दाखवत खासगी कंपनीच्या घशात जाणार या विचाराने तो सतत हैराण असायचा.
मित्रपरिवारातील ज्यांच्याकडे बिएसएनएल लॅन्डलाईन आहे ती चालूच ठेवा व कधी बंद करायची इच्छा झाली तर मला आधी सांगा काय प्राॅब्लेम आहे तो मी दूर करीन हे त्याचं आम्हां सर्वानां सांगणं असायचं.
राजकारण विषय गरजेपेक्षा मनाला तो लावून घ्यायचा नि स्वतःला त्रास करून घ्यायचा .
सध्यच्या सावंतवाडी शहरातील कोरोना प्रसारामुळे कदाचित त्याने डाॅक्टर पासुन लांब रहायचं ठरवलं असावं व मित्रांनाही याची कल्पना नसताना हा अघटित आघात सगळ्यांवर झाला.
सुंदरवाडीच्या गेट टुगेदर असो, मदतकार्य असो, डेटा कलेक्शन असो, नविन मेंबर शोधुन ऍड करणे असो प्रत्येक कार्यात विजूचा सहभाग हा असायचाच.
तब्येतीच्या अनेक तक्रारी घेत तो हसत खेळत, मस्करी करत ,मस्करी झेलत वाटचाल करत होता. कामाचा ताण वाढल्याचे कधीकधी त्याच्या बोलण्यातुन जाणवायचं. नोकरी पुढे चालू ठेवावी की सोडुन व्हिआरएस घेऊन घरी बसावं की आणखी काही करून बघावं याचा विचार सतत त्याच्या डोक्यात असायचा .
आणि या सतत तणावाच्या कामाच्या वातावरणात तो मित्रपरिवारात हसत खेळत रमायचा , राग व्यक्त करायचा , राजकिय मते मांडायचा .कूठुन कुठुन शोधुन पोस्ट आणायचा माहिती द्यायचा .
वेळ असा कधी गेला नि त्याने पथ्यपाणी तितकसं मनावर घेतलं नसावं असं वाटतं.
तो खाण्याचा प्रचंड शौकिन होता आणि मांसाहारी डीश आणि विशेषतः मासे हे त्याचे आवडीचे होते.
कौटुंबिक जबाबदाऱ्या घरातील ‘जाणता’ या नात्याने तो पुढाकाराने पार पाडत होता .घरात गेल्यावर कधीही सख्खे चुलत ही नाती कधी जाणवायची नाहीत एवढं भावंडांची मुलांची नाती आजही त्याच्या घरी एकजीव होती.
ज्या तळमळीने स्वतःच्या मुलांचं सांगायचा करायचा त्याच आत्मियतेने तो भावंडांच्या मुलांचेही कौतुक करायचा सांगायचा.
असा हा आमचा फॅमिली व्हॅल्यूज जपणारा , मित्रपरिवार मिरविणारा विजू आपल्यात नाही हे स्विकारायला मन तयार होत नाही.
सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतानां प्रत्येकासाठीच आई जगदंबेकडे उदंड आयुष्य मागणरा हा अवलिया स्वतःसाठी आयुष्य मागायलाच विसरला आणि अचानक आकाशातला तारा निखळावा तसा गृपमधुन निखळला .
पण प्रत्येकाच्या मनात त्याने केलेलं घर मात्र अंतापर्यंत कायम राहिल.प्रत्येकाला त्याच्या वाढदिवशी त्याचा गृपवर लागलेला ई बॅनर कायम आठवणीत राहिल.
३० ऑगस्टला माझ्याही वाढदिवशी त्याने शेवटचे रंगकाम केले आणि मला शुभेच्छा देत बॅनर लावला .
३१ ऑगस्टपासुन तो गृपवर दिसला नाही मात्र थोडी वातावरण बदलामुळे तब्येत नरम आहे असं दोन तारिखला मला म्हणाला आणि शनिवारी त्याने या जगातून कायमची एक्झिट घेतली.
वादविवादात माझी बाजू कायम गृपवर लावून धरणारा माझा समर्थक नि सगळ्या गृपचा लाडका विजू अनंतात विलिन झाला. सुंदरवाडी गृपवरच्या प्रत्येकाने त्याच्या बरोबरच्या आठवणीनां गेले तीन दिवस उजाळा देत गृपवर श्रद्धांजली वाहत दुखवटा पाळला.
ईश्र्वर त्याच्या आत्म्यास चिरःशांती देवो आणि जगताप परिवार व सुंदरवाडी मित्रपरिवार यानांही या आघातातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
इथे तुझ्या रे घडल्या भेटी
सजवुनी फोटो शुभेच्छा प्रत्येकासाठी
आई जगदंबेच्या उदंड आयुष्य आशिर्वचनी …
सगळ्यांशी जपली नाती
अशी माणसे येती
आणिक जीव लावुनी जाती
निरासगतेच्या बाल्यापरी ते
तुझे बोल मज आठवती
अखेरचा हा तुला दंडवत
सोडुनी जाशी गृप
कॅमेरामन विजू जगतापसह…
चॅनेल आजतक माझे झाले चूप..
भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏
संजू पई,
तळवडा ,
आणि एसपिके सुंदरवाडी गृप ,