बाबू सावंतांची बांधकामकडे मागणी; अन्यथा ग्रामस्थांसोबत उपोषण छेडण्याचा इशारा…
सावंतवाडी
गेली एक वर्ष प्रतिक्षेत असलेल्या सोनुर्ली माऊली मंदिरकडे जाणारा रस्ता तात्काळ करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागा समोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. सोनुर्ली माऊली मंदिराकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची आज श्री.सावंत यांनी पाहणी केली. या रस्त्याला बजेट मधुन मंजुरी मिळाली असताना केवळ निधी अभावी बांधकाम विभागाने केलेले दुर्लक्ष चुकीचे असून याबाबत आपण जातीनिशी लक्ष घालणार,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्री.सावंत म्हणाले, सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली माऊली देवस्थान हे प्रसिद्ध आहे. लोंटागणाची जत्रा म्हणुन या देवीची सर्वदूर ख्याती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मंदिराप्रमाणे माऊली देवी भव्यदिव्य असे नव्याने मंदिरही उभारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. दर दिवशी भाविक भक्तगण तसेच पर्यटकांची रिघ सुरुच असते. मात्र या मंदिराकडे जाणारा रस्ता गेली कित्येक वर्ष वारंवार मागणी करूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे लक्षात घेता रस्त्यावरून वाहन चालवणेही कठीण झाले आहे. यामुळे त्या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक भक्त आणि पर्यटक नाराजी व्यक्त करतो. दोन वर्षांपूर्वी न्हावेली मार्गे सोनुर्लीकडे जाणाऱ्या अर्ध्या अधिक रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र उर्वरित रस्त्याचे काम तसेच राहिल्याने संबंधित रस्ता पूर्णतः खड्डेमय बनला आहे. एकीकडे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित करून पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्न करत असताना तेथील जाणाऱ्या रस्त्यांकडे मात्र प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही बाबू सावंत यांनी केला. या मंदिराकडे वेत्ये मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत तसेच रस्त्याचा काही भाग खड्डेमय झाला आहे. संबंधित ठिकाणी ही संबंधित विभागाने पाहणी करून तो रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा,अशी मागणीही आपण बांधकामकडे करणार आहे. सोनुर्ली रस्त्यासाठी बॅजेटमध्ये मंजुरी आहे, मात्र निधी नसल्याने तालुक्यातील बरेच रस्ते अद्याप प्रतिक्षेत आहेत, परंतु सोनुर्ली येथील जागृत व प्रसिद्ध असा माऊली देवस्थान आणि भाविकांची दररोज असणारी वर्दळ लक्षात घेता या रस्त्यासाठी निधीची तरतूद करुन रस्ता मार्गी लावण्यात यावा. अन्यथा बांधकाम विभागाचे डोळे उघडण्यासाठी आपण ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कार्यालयासमोर उपोषणासारखा मार्ग अवलंबणार असल्याचे त्यांनी सांगितले.