You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा २०२६-२०२७ चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा २०२६-२०२७ चे आयोजन

२३ व २४ मे रोजी कणकवलीत स्पर्धा

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित तथा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्न “सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा २०२६-२०२७” चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ७, ९, ११, १३, १५ आणि १७ वर्षाखालील खुली व मुलींसाठी घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा दि. २३ व २४ मे २०२६ रोजी शिवाजीनगर, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे. स्पर्धा फी प्रति गट ₹१०० ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम दोन स्पर्धकांना राज्य सिलेक्शन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून त्यांना तेथे एन्ट्री फी सवलत व मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्य निवड स्पर्धेअंतर्गत ७ वर्षाखालील गटाची स्पर्धा पुणे येथे ३० व ३१ मे २०२६ रोजी, ९ वर्षाखालील गटाची स्पर्धा संभाजीनगर येथे २ व ३ जून २०२६ रोजी तर १३ वर्षाखालील गटाची स्पर्धा सोलापूर येथे ५ ते ७ जून २०२६ दरम्यान होणार आहे. इतर गटांच्या स्पर्धेच्या तारखा व स्थळे पुढे जाहीर करण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
दि. २३ मे २०२६
७ व ९ वर्षाखालील : सकाळी ९ ते १२
११ व १३ वर्षाखालील : दुपारी ३ ते ६
दि. २४ मे २०२६
१५ वर्षाखालील : सकाळी ९ ते १२
१७ वर्षाखालील : दुपारी ३ ते ६

प्रवेशाची अंतिम तारीख २१ मे २०२६ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून स्पर्धा फी GPay / PhonePe द्वारे ९४२२३८१९४९ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सहभागी होण्यासाठी नाव, जन्मतारीख, वयोगट आणि तालुका ही माहिती WhatsApp वर पाठवावी लागणार आहे.

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक फेरी २० मिनिटांची राहील. खेळाडूंना वयोगटानुसार एकापेक्षा अधिक गटात खेळण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र ज्या गटात खेळणार त्या गटाची फी स्वतंत्र भरावी लागणार आहे.

वयोगटानुसार जन्मतारीख पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे :
७ वर्षे : ०१-०१-२०१९ नंतर
९ वर्षे : ०१-०१-२०१७ नंतर
११ वर्षे : ०१-०१-२०१५ नंतर
१३ वर्षे : ०१-०१-२०१३ नंतर
१५ वर्षे : ०१-०१-२०११ नंतर
१७ वर्षे : ०१-०१-२००९ नंतर

स्पर्धा पंच म्हणून श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली) काम पाहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष श्री. सुयोग घामापूरकर (मालवण), उपाध्यक्ष श्री. सुशील निब्रे (कुडाळ) आणि सचिव श्री. श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली) हे कार्यरत आहेत. सदस्य म्हणून श्री. नंदन वेंगुर्लेकर (वेंगुर्ला), श्री. प्रदीप जोशी (सावंतवाडी), श्री. मिलिंद केळुसकर आणि श्री. शिवाजी शारबिद्रे (कुडाळ) यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा