वालावलमध्ये कृषी दूतांचे आगमन
मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहा महिन्यांचा ग्रामीण कृषी अभ्यास उपक्रम सुरू
कुडाळ | प्रतिनिधी :
मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE – Rural Agricultural Work Experience) कार्यक्रमाअंतर्गत वालावल गावात दाखल झाले आहेत. हे कृषी दूत पुढील सहा महिने गावात मुक्काम करून स्थानिक शेतीपद्धती, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच ग्रामीण जीवनशैलीचा सखोल अभ्यास करणार आहेत.
या उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी वालावल ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सरपंच यांच्याकडे महाविद्यालयाचे अधिकृत पत्र तसेच पुढील सहा महिन्यांच्या विविध उपक्रमांची सविस्तर रूपरेषा सुपूर्द करण्यात आली.
सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कृषी दूतांचे उत्साहात स्वागत करत या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातील प्रत्यक्ष शेती व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांशी संवादातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळणार असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.
