प्राधिकरण निगडी – दिनांक १४ मे २०२६ रोजी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम उद्यानातील सभागृहात परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. मा. डॉक्टर राकेश पाटील अस्थिरोग तज्ञ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर सौ आशा नष्टे यांनी “हीच अमुची प्रार्थना ” सादर केली. यावेळेस सर्व परिचारिका हातात मेणबत्ती घेऊन कोरस देत उभ्या होत्या.
प्रमुख अतिथी तसेच दोन्ही अध्यक्षांचा यावेळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर इंगोले यांनी प्रस्तावना व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सौ शुभदा मेंगळे यांनी अतिथींचा परिचय करून दिला.
डॉक्टरांनी ज्येष्ठामध्ये होणारी हाडांची झीज, सांधेदुखी, गुडघेदुखी व त्यावर प्रतिबंध उपाय व झाल्यानंतर पुढील उपाययोजना याबाबतची माहिती दिली. तसेच ज्येष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही सविस्तर दिली.
सौ आशा नष्टे यांनी प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाला दिलेल्या पंचवीस हजार रुपयांच्या देणगीच्या व्याजातून परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.सौ आशा नष्टे, माधुरी डिसोजा, विभावरी कोटस्थाने, पुष्पांजली सूर्यवंशी, पुष्पा लंके, अंजली कुलकर्णी, वत्सला वाघचौरे या परिचारिकांचा समावेश होता. सर्वांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
डॉक्टर ज्योती इंगोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .श्री नरेंद्र मिसाळ यांनी आभार मानले.
यावेळी माननीय नगरसेविका सौ शैलाताई मोरे, सर्व संघातील आजी-माजी अध्यक्ष व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. संघाची प्रार्थना व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
