*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम चित्र काव्य*
किती ग ओझे शिरावरी त्या
संसार संसार म्हणतात का त्या?
उघडेच बाळ टळटळीत ऊन
जगात नाही खरेच तुझे कोण…
तीन तीन हंडे कडेवर मूल
पाणी भरावे पेटवावी ती चूल
घेणे न देणे उठाठेवी कित्ती
तरी कशी राहू शके शांत चित्ती..
साराच भार माथ्यावरी का
कुठे जाती हो त्या आणा नि भाका
विसरून जावे सोयीस्कर ते
मरू दे मरू दे करते करते…
प्राक्तन आली घेऊन दुष्ट
कसे सरावे सांगना तुझे कष्ट
घाण्याचा बैल जुंपून घ्यावे
सदा बोलणे ते सोशीत जावे…
नको वाटतो जन्म पाहून हाल
मग सृष्टीकर्ता वाटतो जहाल
कधी न्याय तुजला मिळणार नाही
म्हणूनच रूप तुझे आहे आई…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
