*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला हेमचंद्र पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धर्मवीर संभाजी राजे*
शिवराय छावा, शंभूराजे
छत्रपती द्वितीय स्वराज्याचा
मातृविरह सईबाईच्या पुत्रास
पुत्र मग जाहला जिजाऊचा |१|
वय अवघे नऊ वर्षांचे
तहात तारण औरंगजेबाचे
शिवपुत्र शौर्यवंत बाळराजे
दुर्लक्ष पित्याचे, व्याप स्वराज्याचे |२|
क्षात्रतेज मुखावर शंभूच्या
युध्दनीती निपुण, निर्भयता
संस्कृत ग्रंथ बुधभूषण संपन्न
राज्य प्रशासकीय मौलिकता |३|
राखले स्वराज्य नऊ वर्षे
हतबल औरंगजेब हैराण
अटकसत्र जबर राबविताना
हत्यार फितुरीचे घेई सैतान |४|
असीम धैर्याचा राजा सिंह
फाडला जयाने जबडा वाघाचा
थकला युध्दात तो औरंग्या
गिळण्या तत्पर घास धर्मांतराचा |५|
स्वकीय अवसान घातकी क्रूर
खुपसला खंजीर पाठीमागून
बेसावध नदीतिरी संगमेश्वरात
खान मुफर्रब यशस्वी दे पकडून |६|
अवयव एकेक रक्तबंबाळ
छ्ळले, *करी तू धर्मांतर*
साखळदंड फरफटणारा भूवरी
परी थेंब थेंब दे हिंदुत्व ललकार |७|
सीमा क्रौर्याची झाली पार
तरी हृदयी, जागता हिंदुत्व अंगार
लाथाडले *इस्लाम कबूल* भ्याडाला
अंत्यक्षणी परिधान धर्मवीर शृंगार |८|
सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक
