सुदैवानेच अनर्थ टळला; नवीन इमारतीचे काम रखडले
मालवण :
येथील बसस्थानकाची इमारत जीर्ण आणि धोकादायक बनल्याने वर्षभरापूर्वी नवी इमारत मंजूर करून बांधकामदेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र, अलिकडे हे बांधकाम रखडल्याने या धोकादायक इमारती खाली जीव मुठीत घेऊन कर्मचारी आणि प्रवासी वर्गाला वावरावे लागत आहे. आज सकाळी या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणी प्रवासी अथवा कर्मचारी त्याठिकाणी नसल्याने अनर्थ टळला.
मागील वर्षी इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक वृद्ध प्रवासी गंभीर जखमी झाला होता. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना बसस्थानक प्रशासनाकडून होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याबाबत आगर व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता निधीअभावी नव्या इमारतीचे काम रखडले असे समजले होते. मात्र, वरिष्ठ कार्यालायातून माहिती घेतो, असे आगार व्यवस्थापक यांनी स्पष्ट केले.