ऑन कॉल रक्तदाते संस्थेचा १० मे रोजी भव्य रक्तदाता सन्मान सोहळा
१२० हून अधिक ऑन कॉल रक्तदात्यांचा होणार सन्मान
सावंतवाडी :
ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी येथे भव्य रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात १२० हून अधिक ऑन कॉल रक्तदात्यांचा गौरव करण्यात येणार असून विविध मित्रसंस्था आणि महिला रक्तदात्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
रुग्णाला तातडीने रक्ताची गरज भासल्यावर कोणतीही परिस्थिती न पाहता तत्काळ धाव घेणारे रक्तदाते हे समाजातील खरे देवदूत असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली आहे. ऊन, वारा, पाऊस, दिवस-रात्र, स्वतःची कामे, नोकरी-व्यवसाय किंवा घरातील अडचणी यांचा विचार न करता हे रक्तदाते रक्तपेढीत पोहोचून रुग्णांना जीवनदान देतात. त्यामुळे अशा रक्तदात्यांचा सन्मान व्हायलाच हवा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा आधारस्तंभ दयानंद गवस यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून गेल्या वर्षभरात संस्थेसोबत रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या तब्बल २५ मित्रसंस्थांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे. तसेच विविध रक्तदान शिबिरांत रक्तदान करणाऱ्या तीसहून अधिक महिला रक्तदात्यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.
या सर्वांगसुंदर कार्यक्रमासाठी सर्व रक्तदाते, रक्तमित्र, मित्रसंस्था आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी केले आहे.
