You are currently viewing मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी 22 मे पर्यंत अर्ज सादर करावा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी 22 मे पर्यंत अर्ज सादर करावा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी 22 मे पर्यंत अर्ज सादर करावा

सिंधुदुर्गनगरी

 राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ” राबविण्याचे घोषित केले आहे, भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 22 मे 2026 पर्यत ऑफलाइन पध्दतीने अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

            राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रा पैकी एका यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे, तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. या योजनेकरीता सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY) / (PHH) वार्षिक रु. 2.50 लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले (NPH) शिधापत्रिकाधारक, लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व वय वर्ष 60 वरील ज्येष्ठ नागरिक असावा.

            या योजनेअंतर्गत बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय. आर.टी.सी. (IRCTC) समकक्ष अधिकृत असलेल्या जिल्हास्तरीय समितीव्दारे करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीव्दारे करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी (ज्यांचे वय 60 पेक्षा कमी असेल) किंवा सहायक (ज्यांचे वय 21 ते 50 वर्ष असेल) यापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. तरी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा