कार्डिनल, बिशप आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार आशीर्वाद सोहळा; सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा
सावंतवाडी / प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग धर्मप्रांताची स्थापना २००५ साली झाली. या धर्मप्रांतातील सावंतवाडी येथील मिलाग्रीस महामंदिराचे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले नूतनीकरण आता पूर्णत्वास आले असून, नव्याने पुनर्बांधणी करण्यात आलेल्या ‘मिलाग्रीस कॅथेड्रल’चा भव्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा शनिवार, दि. ९ मे रोजी संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक उच्चपदस्थ कार्डिनल, बिशप, धर्मगुरू आणि मान्यवर उपस्थित राहणार असून, सुमारे ५ हजार भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती सावंतवाडी कॅथेड्रलचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर मिलेट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सिंधुदुर्गचे नवनियुक्त बिशप अग्नेलो पिन्हेरो, विकर जनरल रेव्ह. फादर अँद्रू डिमेलो, सहाय्यक धर्मगुरू फादर अमृत, सल्लागार रेव्ह. फादर फेलिक्स लोबो, प्राचार्य रेव्ह. फादर रिचर्ड, माजी नगराध्यक्षा आना रोजीन लोबो, सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस, ऑगस्टीन फर्नांडिस, जो रॉड्रिक्स, डुमिंग डिसोजा, ग्रेगरी डान्टस, स्टीवन डिसिल्वा, रेमी आल्मेडा, डुमिंग आल्मेडा, लॉरेन्स डिसोजा, रॉबर्ट आल्मेडा आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे उद्घाटन मुंबईचे आर्चबिशप एमेरिटस कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते होणार असून, मुख्य मिसा अर्पण सोहळ्याचे अध्यक्षपद गोवा आणि दमणचे आर्चबिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराव भूषविणार आहेत.
या प्रसंगी मुंबईचे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्ज, पुण्याचे बिशप सायमन आल्मेडा, अमरावतीचे बिशप मॅल्कम सिक्वेरा, बेळगावचे बिशप डेरीक, गोव्याचे बिशप सिमाव, नाशिकचे बिशप लुर्ड्स तसेच सिंधुदुर्गचे बिशप एमिरेट्स अल्विन बर्रेटो उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सलेशियन, जेझुइट, कॅप्युचिन आणि फ्रान्सालियन या धार्मिक संस्थांचे प्रांतीय प्रमुखही सोहळ्यास उपस्थित राहतील.
शनिवारी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता नूतनीकरण केलेल्या कॅथेड्रलचे मुख्य उद्घाटन व आशीर्वाद सोहळा होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून, यामध्ये धार्मिक मान्यवर, कॅथेड्रलचे आर्किटेक्ट ब्रायन सोरेस, इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टर मिलिंद तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या भव्य वास्तूच्या उभारणीत सर्व समाजातील नागरिकांचा आणि भाविकांचा मोलाचा सहभाग लाभला असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
