You are currently viewing सिद्धा ऍग्रो इंडस्ट्रीज

सिद्धा ऍग्रो इंडस्ट्रीज

प्रथमेश नाईक यांचा कौशल्यपूर्ण व्यवसाय

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ फोफळीच्या बागा या विपुल प्रमाणात आहेत, किंबहुना किनाऱ्याकडील लोकांचा तर उदरनिर्वाह हा माड फोफळींच्या बागांमधून येणारे उत्पन्न आणि मासेमारी यावरच होत असतो. जिल्ह्यातील अशाच माड फोफळींच्या बागांमधून मोठ्या प्रमाणात त्यांची झावळे, करवंट्या, आदी बिनावापर जळावासाठी वगैरे वापरल्या जातात. परंतु दक्षिण भारतात गेल्या काही वर्षांपासून माड आणि सुपारीच्या झाडांपासून मिळणाऱ्या वेगवेगळ्या घटकांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभे राहिले आहेत. तशाच प्रकारचे उद्योग आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे राहत आहेत. प्रथमेश नाईक यांनी सुद्धा सिद्धा इंडस्ट्रीज च्या नावाने फोफळींच्या वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचा उद्योग सुरू करून त्यातून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देत एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.


प्रथमेशने २०१० साली नवीन मशिनरी घेऊन फोफळींच्या झावळ्यांपासून पत्रावळी, डिश, वगैरे बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. पहिली पाच वर्षे तो मॅन्युअली ऑपरेट होणाऱ्या मशीन वापरत होता. परंतु जसजशी व्यवसायात वाढ होत गेली,तसतशा २०१५ मध्ये नवीन मशिनरी आणल्या. त्यामुळे कामे वेगाने होऊ लागली. फोफळींच्या वस्तू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल त्याने गावातूनच बचत गट वगैरेंच्या माध्यमातून जमविण्यास सुरुवात केला. त्यामुळे गावातील लोकांना देखील रोजगार उपलब्ध झाला. फोफळींच्या नवीन रोपांची लागवड करून बागा तयार केल्या. दक्षिण भारतात अशा सुपारीच्या झाडांच्या पासून तयार होणाऱ्या वस्तूंची मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच धर्तीवर प्रथमेशने आपल्या इंडस्ट्रीज ची सुरुवात जोमाने केली.


सुपारीच्या या प्लेट्स पाच रुपये दराने विकल्या जातात. लग्न कार्यासाठी वगैरे मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या प्लेट्स ना खूप मागणी आहे. सुपारीच्या झावळ्यांपासून छोट्या मोठ्या प्लेट्स, पत्रावळी, द्रोण, वेगवेगळ्या प्रकारच्या डिश, वाट्या, चमचे इत्यादी अनेक वस्तू बनविल्या जातात. त्याचप्रमाणे नारळाच्या करवंटी पासून चमचे, डाऊल, शोभेच्या वस्तू, वगैरे अनेक प्रकार बनविले जातात. अगदी परदेशात देखील त्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे चमचे, प्लेट्स, द्रोण वगैरे परदेशातही एक्स्पोर्ट केल्या जातात. ८० रुपयांपासून पुढे या वस्तू विकल्या जातात. सुरुवातीला सिंधुदुर्ग माचली रिसॉर्टला त्यांचा तयार माल विकला जात होता. या वस्तूंमध्ये केमिकलचा वापर केला जात नसून पाने स्वच्छ धुवून ती मशीनमध्ये प्रेस केली जातात आणि आकार दिला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाया जाणारी सुपारी, नारळाचीही पाने, करवंटी वगैरे प्रक्रिया करून देश विदेशात विकल्या जाऊ लागल्याने जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होत असून, जिल्ह्यात समृद्ध येण्यास सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 11 =