*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांच्या काव्यसंग्रहाचं प्रशांत वाघ यांनी केलेलं परीक्षण*
*यशस्वी जीवनाचा मंत्र – अप्रतिम*
नाशिकच्या कवयित्री प्रा सुमती पवार यांचा अप्रतिम नावाचा अप्रतिम कवितासंग्रह नुकताच वाचनात आला, विध्वंस झाल्यावरही पुन्हा नव्याने कसे उगवून यायचे याचे उत्तम उदाहरण म्हणून दिलेले अप्रतिमच्या मुखपृष्ठावर दिलेले चित्र. माणसला जीवन कसे जगायचे, जीवनात काय मिळवायचे, आयुष्य गमावल्यावर पुन्हा उमेदीने कसे उभे राहायचे हे या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरून आकलन होते. आणि हाच गाभा पकडून कवयित्री सौ. सुमती पवार यांच्या अप्रतिम काव्यसंग्रहाकडे पाहता येईल.
माणसाने आयुष्यात कधीच हार माणू नये, आल्या प्रसंगाशी बळकट मनगटाच्या जोरावर सामना करता आला पाहिजे, कुणाचे नशीब कुणी लिहित नाही आणि कोणी पुसतही नाही, ज्याचे त्यालाच घडवावे लागते. स्वकष्टाने आणि अक्कलहुशारीने समाजात पद , पैसा मिळवावा लागतो. शून्यातूनही साम्राज्य उभे करण्याची धमक ठेवावी लागते हेच अप्रतिम या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील तोडून टाकलेल्या झाडाला फुटलेल्या पालवीतून समाजाला संदेश दिला गेला आहे आणि म्हणूनच कवयित्री येते पहा आणिबाणी या कवितेत म्हणतात की –
*हार मानू नये पहा*,
*कष्टावरती ठेवा भरवसा*.
*कष्टाने का माणूस मरतो ?*
*कष्ट करुनी मजबूत होतो.*
माणसाचे आयुष्य एक गूढ पुस्तक असते, माणूस जीवनात जसे जसे पुढ जातो तसा तसा मागचा भूतकाळ त्याला आठवत असतो, गतकाळाच्या वटवृक्षाखालून जातात भविष्यकाळाच्या आशा अपेक्षांचे ओझे डोक्यावर भार म्हणून चढत जाते. पुढचे आयुष्य कोणी पाहिले, पुढे काय होईल हे कुणालाच सांगता येणार नाही, आणि मागे काय झाले हे आठवत बसले की पुन्हा आयुष्य उसवले की काय असे वाटते आणि हा धागा पकडून कवयित्रीने गूढ… गहन ते… या कवितेत म्हटले आहे की –
*गूढ गहन ते आयुष्याचे पुस्तक आहे,*
*पाने उलटत जो तो मागे वळून पाहे.*
*पुढची पाने असती कोरी,* *माहित नसते काही,*
*म्हणून बघती उलटून पुन्हा ते मागील शाई*
आपण ज्या भूमीत जन्मलो, ज्या समाजात राहिलो त्या भूमीचे, त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात जपली पाहिजे. या भूमीचे आपल्यावर अनंत ऋण आहेत, ते ऋण फेडण्यासाठी, त्यातून उतराई होण्यासाठी धन दौलत किवा पद खर्च करावे लागत नाही त्यासाठी माणूस म्हणून नाव निघाले पाहिजे एवढेच केले तरी आपल्या परीने उतराई होता येईल. अप्रतिम या कवितासंग्रहात कवयित्रीने समाजात वावरतांना माणसानं माणूस म्हणून जगलं पाहिजे हा खूप मोठा मोलाचा संदेश दिला आहे.आणि म्हणूनच कवयित्री ऋण फेडून मग जावे या कवितेत म्हणतात की –
*ती भू माता नि आपुला देश महान *,
*ऋण अपार त्यांचे, तेच आपुली शान*.
*आपल्या परीने ऋण उतराई व्हावे.*
*ठेवून थोडेसे नावच मागे जावे*
*जो जन्मा आला कार्य करुनी गेला*
*माणूस म्हणुनी जन्म सफल मग झाला.*.
माणूस नेहमी मृगजळी स्वप्नाच्या दुनियेत जगत असतो, कष्ट करायला नको, आयतं खायला मिळाले पाहिजे ही भावना काहींच्या मनात सतत घोंगावत असते आणि ते वागतातही तसेच. अशा लोकांनी कष्टाची जाण ठेवली पाहिजे. मुंगीचा जीव कितीसा, पण डोंगर पोखरून काढण्याची हिम्मत तिच्यात आहे, एकमेकांना हात देवून काम केले तर अशक्य असणारे काम देखील शक्य होते. केवळ दैववादावर भरवसा ठेवून बसलो तर काम होणार नाही, त्यासाठी कष्टच करावे लागतील हा मोलाचा संदेश देतांना कवयित्री यशस्वी जीवनाचा मंत्र… या कवितेत लिहितात की –
*उगा मृगजळापाठी धावण्यात हाशिल काय?*
*धडपडीशिवाय जीवनात सांगा मिळते काय?*
*मुंग्या पोखार्ती डोंगर, सहस्त्र हात करती काम*.
*नुसते राम राम म्हणुनी, बसुनी होत नाही काम.*
अप्रतिम या काव्यसंग्रहात कवयित्रीने एकूण ९८ कवितांचा समावेश केलेला असून सर्वच कविता सामाजिक, कौटुंबिक आशयाला धरून आहेत. जीवनात जो जो अनुभव आला तो तो टिपण्याचा प्रयत्न केला आहे . या संग्रहात निसर्ग, प्रेम, कुटुंब, आई, अशा नेक विषयावर काव्यलेखन केलेलं आहे मन मंदिर..चैतन्य, का असे देवा?, कधी विसरू नका हो त्यांना,जय जवान, जखम कुणी विसरतो? अशा अनेक कविता देव, देशभक्ती, आणि बऱ्याच विषयाला धरून आहेत. या संग्रहाला शुभेच्छा देतांना प्रसिद्ध साहित्यिका तथा व्याख्यात्या डॉ प्रतिभा जाधव यांनी दिलेली प्रस्तावना काळीजनातं या शब्दात केलेली कौटुंबिक पाठराखण कवयित्रीच्या साहित्यिक वैभवात भर घालणारी आहे. प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार दीपक दंडवते यांच्या कुंचल्याच्या अदाकारीने सजलेले मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधून घेते तर पुण्याचे वैशाली प्रकाशन यांनी या कलाकृतीला प्रकाशित करून साहित्य भांडारात मोलाची भर घातली आहे .
प्रशांत वाघ *(पॅसिफिक टायगर)*
संपर्क – ७७७३९२५००० *(तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार)*
कलाकृती परिचय:
कलाकृती – *अप्रतिम*
साहित्य प्रकार – *कवितासंग्रह*
कवयित्री – *प्रा. सौ. सुमती पवार*
संपर्क क्रमांक – *९७६३६ ०५६४२*
मुखपृष्ठचित्रकार- *दीपक दंडवते*
प्रकाशक – *वैशाली प्रकाशन, पुणे*
