सावंतवाडी
रस्ता कामांच्या शुभारंभावरुन आज माजगाव येथे पंचायत समिती सदस्य बाबू सावंत आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी यांच्यात शाब्दीक वाद झाला. आपल्याला विश्वासात न घेता श्री.दळवी यांनी त्या रस्त्याचे गुपचूप उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा प्रयत्न आपण उधळून लावला, असा दावा श्री.सावंत यांनी केला आहे. तर आमचे आताचे पालकमंत्री उदय सामंत व माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्या रस्त्यासाठी निधी दिला होता. त्यामुळे सरपंच दिनेश सावंत यांच्या बोलविण्यावरुन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. परंतू सावंत यांनी विरोध केल्यामुळे आपण तेथून परतलो, असे श्री.दळवी यांनी सांगितले. माजगाव येथे चर्मकारवस्तीत जाणार्या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभावरुन हा वाद झाला. मात्र आपल्याला अशा प्रकारच्या नाहक वादात पडायचे नाही, असे दळवी यांचे म्हणणे आहे.