सावंतवाडीत तालुका पत्रकार संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा ३० एप्रिलला
नितेश राणे प्रमुख पाहुणे; आदर्श पत्रकारांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा होणार सन्मान
सावंतवाडी
येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या गुरुवारी, ३० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या या पत्रकार संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श पत्रकार आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. ‘वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ रुपेश हिराप यांना, तर ‘जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार सौ. मंगल नाईक-जोशी यांना प्रदान करण्यात येईल. समाजसेवेसाठीचा आदर्श पुरस्कार भगवान शेट्ये यांना, तर जीवनगौरव पुरस्कार अभय पंडित यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय संतोष परब यांना अष्टपैलू स्मृती पुरस्कार आणि हेमंत काळसेकर यांना ज्येष्ठ पत्रकार व छायाचित्रकार पुरस्काराने गौरविण्यात येईल.
पुरस्कार वितरण सोहळ्यासोबतच पत्रकारितेत विशेष प्राविण्य मिळवलेले पत्रकार आणि पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आणि सहसचिव विनायक गावस यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
