♦सावंतवाडी नगरपालिका ही आपल्या स्वच्छ कारभारसाठी ओळखली जाते. शहरात असलेली सुशिक्षित, नोकरदार, व्यावसायिक लोकांची वस्ती, त्यामुळे बाजारपेठही विस्तीर्ण आहे, उलाढालही मोठी असते. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातूनही लोक बाजारहाटासाठी सावंतवाडीत येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला वगैरे विक्री होतो.
♦बेळगाव, संकेश्वर भागातूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येतो, तसाच सावंतवाडीच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून ग्रामीण स्त्रिया, पुरुष सुद्धा स्वतः काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला सावंतवाडीत विक्रीस आणतात. सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी त्यांच्याकडून पैसे घेऊन रीतसर पावती देतात.
♦आज सकाळी असाच स्वतःच्या शेतात कष्ट करून पिकवलेली भाजी घेऊन मळगाव येथील भाजी विक्रेती महिला दिव्या कांबळे ही सावंतवाडीच्या बाजारपेठेत भाजी विकायला बसली असता, तिच्याकडून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन रीतसर पावती दिली. परंतु पावती दिल्यानंतरही तिच्याकडे अतिरिक्त पैशांची मागणी केली असता तीने ते पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग आल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी तिची भाजी कचरा कुंडीत फेकून देण्याची धमकी दिली.
♦सावंतवाडीत गेली कित्येक वर्षे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांसोबत परप्रांतीय व्यापारी सुद्धा विक्री व्यवसाय करतात. परंतु आपल्याच स्थानिक व्यापाऱ्यांना असा त्रास का दिला जातो हा प्रश्न पडत आहे. स्थानिक व्यापारी महिला सुद्धा पैसे देऊन पावती करतात, मग परप्रांतीय लोक पावती व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देतात म्हणून हा भेदभाव केला जातो का?
♦काही परप्रांतीय लोकांची फळांची दुकाने सुद्धा रस्त्यावर मांडलेली आहेत, काही हातगाड्या रस्त्यावर लावल्या जातात, आणि नगरपालिका कर्मचारी त्यांच्याकडून जास्त पैसे अनधिकृतपणे मिळतात म्हणून त्यांच्यावर कधीही कसलीही कार्यवाही न करता त्यांना अभय देतात.
♦एकीकडे सरकार शेतकऱ्यांना शेतीकडे वळा म्हणून प्रोत्साहन देते, शेतीकर्ज वगैरे देऊन गोरगरीब जनतेला शेतीतून समृद्धीकडे जायला प्रोत्साहन देते, आणि शेतीतून उत्पादित माल बाजारात आणल्यावर त्यांच्याकडून अशाप्रकारे अवाजवी पैसे मागून गोरगरिबांच्या पोटावर पाय आणला जातो, हे निश्चितच चुकीचे आहे.
♦सावंतवाडीत सुरू झालेल्या या प्रकारावर सावंतवाडीच्या नगराध्यक्षांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून असे चिरीमिरी घेण्याचे प्रकार पुन्हा होणार नाहीत. आणि जे कर्मचारी अशा प्रकारची वर्तणूक करतात त्यांना अद्दल घडेल, व पुन्हा असा प्रकार सावंतवाडी सारख्या शहरात होणार नाही.