सिंधुदुर्गनगरी
देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जि.प. अध्यक्षा श्रीमती समिधा नाईक उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही यात्रा जरी रद्द झाली असली तरी यात्रेदरम्यान मंदिर समिती विश्वस्तांसह केवळ 50 भाविकांच्या उपस्थितीत देवस्थानचे नित्योपचार तसेच इतर धार्मिक विधी पार पाडता येतील मात्र, हे विधी पार पाडत असताना त्यामध्ये किमान अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. त्याचबरोबर मंदिरात कोविड संदर्भातील सर्व निकषांचे पालन करण्यात यावे. आरोग्य विभागाने याठिकाणी पथक नेमावे. त्याचबरोबर यात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवावा. मंदिरात भाविकांनी एकत्रित गर्दी करु नये, असे सांगून कुणकेश्वर ग्रामस्थांनी यात्रा निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
या आढावा बैठकीसाठी प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरिक्षक संजय कातीवले, मंदिर समिती अध्यक्ष संजय वाळके, सचिव बाळकृष्ण मुणगेकर, सरपंच गोविंद घाडी, मंदिर व्यवस्थापक रामदास तेजम आदि उपस्थित होते.