You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर सकारात्मक हालचाल

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर सकारात्मक हालचाल

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर सकारात्मक हालचाल

नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांची पुढाकार; विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

सावंतवाडी

सावंतवाडी, ता. २२ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी आज झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. उपजिल्हा कृती समितीच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
रुग्णालयातील विविध असुविधांबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षांनी रुग्णालय प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रुग्णालयाच्या इमारतीवर व परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्या त्वरित तोडून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांच्या समन्वयाने पूर्ण करावे, असे आदेशही देण्यात आले.
पाणीपुरवठ्याच्या समस्येवर उपाय म्हणून थकीत देयके भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या देयकांवरील व्याज माफ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर रुग्णालयाला नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार असून, यामुळे भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयात नवीन बेंच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रुग्णालय परिसरात पथदिवे बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पोस्टमार्टम रूमच्या नूतनीकरणाबाबतही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
याशिवाय, रुग्णालयातील व्हीलचेअरची कमतरता, डॉक्टरांच्या निवासाची समस्या यावरही चर्चा झाली. जुन्या वेंडरची थकीत बिले लवकरच अदा केली जातील तसेच डॉक्टरांसाठी नवीन निवासस्थाने उभारण्यासाठी विशेष तरतूद केली जाईल, असे प्रशासनाने आश्वासन दिले.
या बैठकीला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, रुग्णालय प्रशासनाचे डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, विविध विभागांचे अधिकारी तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा