फोंडाघाटमध्ये श्री वाघोबा मंदिरात ‘रक्षणकर्ता दिवस’ उत्साहात
सत्यनारायण पूजा, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; दिनेश केळुस्कर व अजित नाडकर्णी यांचा सत्कार
फोंडाघाट :
येथील श्री वाघोबा मंदिरात ‘वाघोबा माहेरवाशियांचा रक्षणकर्ता दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधीने झाली. त्यानंतर नवस फेड कार्यक्रम पार पडला. दुपारी श्री सत्यनारायण महापूजा, आरती व त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अल्पावधीत, अवघ्या एका रात्रीत मंदिर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मीडिया वार्ताहर दिनेश केळुस्कर व अजित नाडकर्णी यांचा मंडळाच्या वतीने नारळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. भविष्यात मंदिरासाठी किंवा गावासाठी कोणतीही मदत लागल्यास सदैव सहकार्य करू, असे आश्वासन दोघांनीही यावेळी दिले.
कार्यक्रमास अजित नाडकर्णी हे पत्नी शुभांगी सह उपस्थित होते. तसेच दिनेश केळुस्कर यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. रात्री भजन तसेच दशावतारी नाटकाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने वातावरण अधिक रंगतदार झाले.
सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी मंदिर उभारण्याचे आव्हान दिनेश केळुस्कर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अजित नाडकर्णी यांनी त्यांचे विशेष आभार मानले. मंदिराबद्दल माहेरवाशीयांमध्ये विशेष श्रद्धा असून वाघोबा हे रक्षणकर्ते देवस्थान म्हणून ओळखले जाते.
