कणकवलीत परशुराम उपरकरांचा इशारा : अमली पदार्थ, मटका-जुगाराविरोधात शिवसेना उतरवणार थेट कारवाई
युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात; पोलिसांनी कारवाई न केल्यास अवैध अड्ड्यांवर धाड टाकणार
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. तसेच पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून ठोस कारवाई न झाल्यास शिवसेना स्वतः अवैध धंद्यांवर धाड टाकणार, असा इशाराही त्यांनी दिला.
कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, पोलीस यंत्रणेकडून आठवड्यातून एक-दोन दिवस अमली पदार्थ आणि मटक्यावर धाडी टाकल्याचे दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात अमली पदार्थांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. या व्यसनाधीनतेत अडकलेल्या अनेक तरुणांवर आत्महत्येची वेळ येत असून जिल्ह्यात वर्षाला सरासरी दीडशे आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला.
उपरकर यांनी पुढे सांगितले की, सिंधुदुर्गात पत्ते आणि जुगाराचे अड्डेही खुलेआम सुरू आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर ओरोस खुर्द येथे मोठा जुगार अड्डा चालत असून त्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याशिवाय माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सुली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड आणि कट्टा या ठिकाणीही खुलेआम जुगार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
सिंधुदुर्गात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीही मटका व जुगार रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका उपरकर यांनी केली. येत्या काही दिवसांत पोलिसांनी सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद न केल्यास शिवसेना अशा ठिकाणी धाड टाकून ते बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला.
