You are currently viewing बांद्यात मृत माकडामुळे खळबळ; माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

बांद्यात मृत माकडामुळे खळबळ; माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

बांद्यात मृत माकडामुळे खळबळ; माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

पुणे पथकाकडून सखोल तपासणी; शेकडो गोचीडींचे नमुने प्रयोगशाळेकडे

बांदा

सटमटवाडी परिसरात मृत माकड आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून माकडतापाच्या संशयामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांत दोन रुग्णांना माकडतापाची लागण झाल्याचे समोर आल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक गावात दाखल झाले असून त्यांनी पीपीई किट परिधान करून मृत माकड सापडलेल्या ठिकाणी सखोल पाहणी केली. यावेळी परिसरातून शेकडो गोचीडी गोळा करण्यात आल्या असून त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात येणार आहेत. या तपासणीचा अहवाल सुमारे आठ दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, डिंगणे-बांबरवाडी येथेही एका माकडाचे अवशेष आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेत अवशेषांची तातडीने विल्हेवाट लावली.
परिसरात दूषित गोचीडी आढळल्यामुळे आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहीम अधिक तीव्र केली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, जंगल भागात जाणे टाळावे आणि ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा