मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंचा शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली होती. या टीकेला शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नारायण राणे काय बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या उद्धव ठाकरे करत आहेत. लोकांनीसुद्धा त्या मान्य केल्या आहेत. मर्यादित स्वरूपात लग्न समारंभ, कार्यक्रम व्हावेत आणि गर्दी कमी व्हावी यासाठी लोकही आता प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकही प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे राणे काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती जबाबदारी योग्य प्रकारे उद्धवजी पार पाडत आहेत.
गेलं अधिवेशनसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले होते आणि येणारे उन्हाळी अधिवेशन एक मार्चला सुरू होत आहे. ज्या प्रमाणे ठरलंय त्या प्रमाणे हे अधिवेशन पार पडेल. असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे. मात्र नारायण राणेंनीच गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या गोष्टीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचा पलटवार आ.वैभव नाईक यांनी केला आहे.