*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”भय इथले संपत नाही”*
(लवंगलता वृत्त)
काय करावे, कसे जगावे, भय का इथले संपत नाही..?
जाती धर्मा नावे घडणे दंगल बिंगल गंमत नाही
पदोपदी अन् रस्तोरस्ती अन्यायाने विणले जाळे
गळून पडते गरीब जनता, नेते शासन नामनिराळे
बेरोजगारि नि महागाई जटिल समस्या देशापुढली
त्याच कारणे गुन्हेगारी, व्यसनाधिनता किती वाढली?
कुणी बोलता प्रश्नांवरती, धमकी दहशत धाक दावती
शिकली पोरं मार्ग चुकीचा व्यवस्थेमुळे खरे चालती
प्रेम भावना उच्च कोटिची भले वाटते एक क्षणाला
पण मृत्यूला कवटाळूनी दुःख न द्यावे मायपित्याला
तरुण पिढी ही सहजच करते आत्मसमर्पण आयुष्याचे
फुलांसारखे सांभाळीले हे चुकले का माय पित्याचे?
परंपरा अन् रीत सोडुनी सुशिक्षित पिढी कुठे चालली..?
बुवाबाजी नि जादूमंतर करुन कुणाची दशा बदलली?
गैरसमजुती पोटी जाती मंत्री संत्री भोंदू मागे
प्रश्न सुटाया अपुल्या मनचा, जनतेने पण व्हावे जागे
🖊️ दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
