You are currently viewing अगम्य
Oplus_16908288

अगम्य

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे विनय पारखी यांनी केलेलं रसग्रहण*

 

*अगम्य*

 

मनाने ब्रह्मांड व्यापिले आहे

स्पंदनात तुझेच स्मरण आहे

 

आशा अंतरी भेटशील एकदा

जीवाला या तुझा ध्यास आहे

 

कळते भास सारे हे मृगजळी

साक्ष अगम्याचीच सत्य आहे

 

वास्तवातील स्पर्श निःशब्दांचे

चैतन्याचेच अनाहत गूढ आहे

 

पंचतत्वात भारलेले ऋतूऋतू

कृपाळू कृपावंती दृष्टांत आहे

 

मनाने ब्रह्मांड व्यापिले आहे

स्पंदनात तुझेच स्मरण आहे

 

*© वि. ग. सातपुते*

 

भावकवी वि. ग. सातपुते सरांची ‘अगम्य’ ही कविता नावाप्रमाणेच अत्यंत गहन आणि अनाकलनीय रहस्यांचा उलगडा करणारी आहे. ‘अगम्य’ म्हणजे जे केवळ इंद्रियांना किंवा तर्काला साध्य नाही, तर जे बुद्धीच्याही पलीकडचे आहे; आणि हेच गूढत्व या कवितेच्या नसानसात भिनलेले जाणवते. मानवी मनाचा तळ गाठणे, ईश्वरी सत्तेचा शोध, निसर्गदत्त प्रेम आणि अध्यात्मातील आर्त भक्ती हे विग सरांच्या लेखणीचे आवडते विषय आहेत. या कवितेतही अध्यात्म, भक्ती आणि मानवी मनाचा ईश्वरी शक्तीशी होणारा विलक्षण संगम सरांनी अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे.

 

या कवितेचा मुख्य गाभा ईश्वरी शक्तीचा शोध हा आहे. कवितेची सुरुवात आणि शेवट ‘मनाच्या विशालतेपासून ते स्पंदनातील सूक्ष्मापर्यंत’ अशा एका अफाट प्रवासाने होतो. कवितेचे पहिले कडवे वाचताच समर्थ रामदास स्वामींच्या ‘भीमरूपी महारुद्रा’ या स्तोत्राची प्रकर्षाने आठवण होते; कारण दोन्हीकडे ‘मन’ आणि ‘ब्रह्मांड’ यांच्या अथांगतेचा मिलाफ आढळतो. दोन्ही रचनांमधील समान धागा म्हणजे ईश्वरी तत्त्वाचे आणि त्याच्या विराट रूपाचे केलेले दर्शन.

 

‘स्पंदनात तुझेच स्मरण आहे’ ही ओळ जणू स्तोत्रातील रामदूताच्या अखंड स्मरणाशीच नाते सांगते. मारुतीराया हे प्राणवायूचे अधिष्ठाता असल्याने, श्वासातील ‘स्पंदन’ आणि भक्तीचा ‘ध्यास’ यांचा येथे अपूर्व संगम झाला आहे. विशेष म्हणजे, हनुमान हे वायूचे पुत्र असून त्यांच्या बाह्य शक्तीचे आणि पराक्रमाचे वर्णन स्तोत्रात येते; तर आप्पांच्या या कवितेत त्याच शक्तीचे मानवी अंतर्मनातील आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले आहे. थोडक्यात, स्तोत्रातील ‘विराट’ आणि कवितेतील ‘अगम्य’ या एकाच ईश्वरी सत्तेच्या दोन बाजू आहेत.

 

कवितेच्या नंतरच्या दोन कडव्यांमधून भक्ताची किंवा साधकाची उत्कट ओढ आणि आध्यात्मिक अस्वस्थता व्यक्त होते. ज्याप्रमाणे ‘भीमरूपी’ स्तोत्रात समर्थ म्हणतात, “भक्तां कामदुधा…” म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो मारुती आहे; त्याच श्रद्धेतून या कवितेत ‘आशा अंतरी भेटशील एकदा’ हा भाव उमटला आहे. या मानवी मनाला ईश्वराच्या भेटीची एक ठाम ‘आशा’ त्याच्या अंतर्मनात सतत जिवंत आहे. ‘ध्यास’ हा शब्द केवळ ओढ दाखवत नाही, तर ती एक प्रकारची तहान आहे, जी त्या परम तत्त्वाच्या भेटीशिवाय शमणार नाही. स्तोत्रात मारुतीच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, तर इथे त्या ‘अगम्य’ शक्तीच्या भेटीचा ‘ध्यास’ आहे. दोन्हीकडे एकच ओढ आहे -एकीकडे ती ‘रामदूता’साठी आहे, तर दुसरीकडे ती ‘अदृश्य ईश्वरी तत्त्वा’साठी लागलेला ध्यास आहे.

 

पुढील कडव्यात ‘मृगजळ’ आणि ‘अगम्य’ या शब्दांच्या माध्यमातून आप्पांनी एक खोल तात्त्विक रहस्य उलगडले आहे. हे नश्वर जग, नातीगोती आणि भौतिक सुखांचा पसारा म्हणजे केवळ एक ‘भास’ असून तो ‘मृगजळा’प्रमाणे फसव्या अस्तित्वाचा आहे. जे डोळ्यांना दिसते ते क्षणभंगुर आहे आणि जे ‘अगम्य’-म्हणजेच बुद्धी आणि तर्काच्या पलीकडचे आहे-तेच एकमेव ‘शाश्वत सत्य’ आहे, असा विवेकपूर्ण उलगडा आप्पा येथे करतात.

 

या मांडणीचा ‘भीमरूपी’ स्तोत्राशी असलेला मेळ थक्क करणारा आहे. समर्थांनी मारुतीरायांचे वर्णन ‘ब्रह्मांडासारखे’ विशाल केले असले, तरी सातपुते सरांच्या कवितेत तीच शक्ती ‘अगम्य’ आणि ‘स्पंदनातील’ अतिसूक्ष्म स्वरूपात अधिष्ठित आहे. समर्थांनी मारुतीला ‘प्राणवायू’ संबोधले आहे; वायू डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही-तेच सत्य आहे. अगदी त्याचप्रमाणे, जे चर्मचक्षूंना दिसत नाही, तेच ‘अगम्य’ तत्व विश्वाचे अंतिम सत्य असल्याची ग्वाही आप्पांनी या कवितेतून दिली आहे. येथे कवीने ‘विवेक’ आणि ‘वैराग्य’ एकाच वेळी अधोरेखित केले आहे.

 

विगसा आप्पांनी या ओळींमध्ये ‘मौन’ आणि ‘चैतन्य शक्ती’ यांच्यातील अद्वैत मांडले आहे. वास्तवात आपल्याला शब्दांची गरज भासते, पण खरं सत्य ‘निःशब्द’ असण्यात आहे. ज्याप्रमाणे ‘भीमरूपी’ स्तोत्रात मारुतीरायांचे वर्णन ‘रामदूताच्या’ मौन पण शक्तिशाली रूपाने येते, तसेच इथेही ते ‘चैतन्य’ अनाहत म्हणजे ज्याचा अंत नाही असे गूढ म्हणून मांडले आहे. हे चैतन्य म्हणजेच तो ‘प्राणवायू’ जो अखंड वाहतो पण तो दिसत नाही नुसता जाणवतो, तसेच चैतन्य हे शब्दांपलीकडचे असून केवळ अनुभवाचा विषय आहे.

 

*पंचतत्वात भारलेले ऋतूऋतू’ ही ओळ सृष्टीच्या चक्राचे दर्शन घडवते.*पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमध्ये तोच ईश्वरी अंश भरून उरला आहे. प्रत्येक ऋतूचे बदलणे हे केवळ निसर्गचक्र नसून, ती त्या ‘कृपाळू’ ईश्वराची आपल्यावर असलेली ‘कृपा’ आहे. हा एक प्रकारचा ‘दृष्टांत’ आहे की तो ईश्वर चराचरात व्यापलेला आहे. समर्थांनी मारुतीचे वर्णन करताना “ब्रह्मांडासारखे” असे म्हटले आहे, म्हणजेच पंचमहाभूतांनी बनलेले हे संपूर्ण विश्व त्यांचेच रूप आहे. अप्पांच्या कवितेतही ‘पंचतत्वात भारलेले ऋतूऋतू’ यातून हेच तत्व व्यक्त होते. *निसर्गातील प्रत्येक ऋतूचा बदल हा त्या ‘कृपाळू’ ईश्वरी शक्तीचा ‘दृष्टांत’ आहे.* स्तोत्रात मारुती जसा भक्तांचे रक्षण करणारा ‘कृपाळू’ आहे, तशीच ही निसर्गातील शक्ती चराचरात भरून राहिलेली ‘कृपावंती’ आहे असे रहस्य यातून आप्पांनी उलगडले आहे.

 

या कवितेचा शेवट पुन्हा एकदा पहिल्या कडव्याने होतो कारण दुसऱ्या ओळीत आलेला ‘स्पंदन’ हा शब्द. मनात सारे व्यापलेले ब्रह्मांडी विचार त्याचे मेंदूला झालेले स्मरण हे केवळ मेंदूचे किंवा विचारांचे राहिलेले नाही, तर ते आता रक्ताभिसरणात आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात ‘स्पंदनात’ भिनले आहे. जे श्वासागणिक होणारे हे स्मरण हीच त्या अदम्य ईश्वरी शक्तीच्या भक्तीची किंवा प्रेमाची ‘पराकोटीची अवस्था’ दर्शवते. इथे स्थळ आणि काळ यां पलीकडे गेलेला एक अद्वैत भाव दिसून येतो म्हणूनच कदाचित *आप्पांनी या कवितेला ‘अगम्य’ असे नाव दिले असेल.*

 

*© विनय पारखी* (अंधेरी, मुंबई )

प्रतिक्रिया व्यक्त करा