You are currently viewing मन माझे कुरुक्षेत्र

मन माझे कुरुक्षेत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*

 

कवितासंग्रह

*मन माझे कुरुक्षेत्र* 

कवी श्री प्रकाश पाठक

 

युगंधरा प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर

मुखपृष्ठ मांडणी दासू भगत

पुस्तक किंमत२०० रुपये

पृष्ठसंख्या११४

 

मन माझे कुरुक्षेत्र

युगंधरा प्रकाशन छत्रपती संभाजीनगर ह्यांनी प्रकाशित केलेला मा प्रकाश पाठक ह्याचा हा पहिलाच १०० कवितांचा कवितासंग्रह आहे.

संग्रहाच्या नावाला साजेसे मुखपृष्ठ पाहूनच आतील अंतरंग कसे असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. कवीने हा संग्रह आपल्या आईवडिलांना अर्पण केलेला आहे. १०० कवितांना अनुक्रम देतांना कवीने भावनिक, राजकीय वैचारिक सामाजिक, साहित्यिक व व्यक्ती विशेष असे वर्गीकरण केलेलेआहे. कोणतेही काम नेटके करण्याची ही त्यांची वृत्ती बहुद स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी करताना मिळालेली आहे .कविताचे वेगवेगळे गट देखील हेच दर्शवितात असे माझे मत आहे मनोगतात त्यांनी मोकळेपणाने वाचकांशी संवाद साधलेला आहे. बँकेत साडेतीन दशक आकड्यांशी खेळत असतांनाही त्यांचीं साहित्याची आवड जराही कमी झालेली नाही. त्यांच्या लेखन प्रवासात त्यांना प्रेरणा देणारी पत्नी व सर्व आप्तेष्ट ह्यांचा ही ते आदराने उल्लेख करतात. लेखक कवी बालसाहित्यिक, समीक्षक श्री अरुण वि देशपांडे बावधन ह्यांची ह्या पुस्तकाला प्रस्तावना आहे. लेखकाच्या वडिलांचे ते मित्र आहेत, त्यामुळे प्रस्तावनेला आपुलकीचा सुगंध जाणवतो.

जय गजानन, श्री गजानन ह्या कवितेने सुरवात करणाऱ्या कवींची ईश्वरविषयीची भावना कवितेत स्पष्ट होते. कवी मनाला कुरुक्षेत्र म्हणतो रूपक अलंकारांचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे असे मला वाटते. मनुष्याच्या मनात सतत द्वंद्व सुरू असते. विवेकानेच आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो असे पाठक सरांचे म्हणणे योग्य आहे. हे मन माझे कुरुक्षेत्र ह्या कवितेतून स्पष्ट होते कवितांची वर्गवारी केल्यामुळे वाचक सहजतेने आपल्याला आवडणाऱ्या कवितांचा त्या त्या दालनात जाऊन आनंदाने आस्वाद घेऊ शकतो. पाठक सरांनी कवितांची केलेली विभागणी माझ्याप्रमाणेच सर्व वाचकांना नक्कीच खूप आवडणार असे मी खात्रीने म्हणेन.

वात्सल्याचा रानमेवा ही कविता तिच्या नावाप्रमाणे रसिकांना आनंद देणारी आहे. तर लगेच भेट आपली पहिली ह्या कवितेत तरुण मनास आपल्या प्रियेबद्दल वाटणारी ओढ स्पष्ट होते ऋतू प्रेमाचा, माझी आठवण येईल का वाचत असतांना लगेच असणारी कुंपण कविता वाचकांना संयमाचे महत्व सांगते मनात असलेली हुरहूर कवी व्यक्त करतो. निसर्गाला कवी विसरलेला नाही. तसेच जीवनातील सामाजिक घटनांचेही भान ठेवून मदतीचा हात,पाऊलखुणा मैफिल अशा कवितांतून कवीच्या अंतरंगातील भावना सहज समजतात.जीवनात नात्यांना महत्व असते ह्याची जाणीव असलेले पथक ,नाळ नात्याची ह्या कविता जीवनात नात्याचे महत्व काय असते हे स्पष्ट करतात व लगेच पुढची कविता पाठक आपल्या आदरणीय दादा साठी ,वडिलांसाठी लिहितात तर स्त्रीबद्दल असलेला आदर आपल्याला नारी घे उंच भरारी ह्या कवितेत स्पष्ट जाणवतो. सामर्थ्य लेखणीचे ही कविता साहित्यिकांची भूमिका स्पष्ट करते.शेवटल्या व्यक्तीविशेष या विभागात पाठकांनी लता मंगेशकर संत तुकाराम संत एकनाथ ह्यांच्याविषयी आदर प्रकट केला आहे एकूणच

100 कवितांमध्ये मनुष्य जीवनाच्या सर्वांगीण अनुभवाबद्दल विचार व्यक्त करण्यामध्ये कवी श्री प्रकाश पाठक पूर्णपणे यशस्वी झाले आहेत असे म्हणता येईल.

या कवितांमधून त्यांच्या विचारांची परिपक्वता व संवेदनशीलता आढळून येते, त्यांच्या नम्र स्वभावाचे सहज सुंदर दर्शन होते म्हणूनच बहुदा श्री अरुण देशपांडेंनी शेवटच्या पानावर त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत पाठक सरांच्या चेहऱ्यावरून सुज्ञ वाचकांनाही त्यांचे व्यक्तिमत्व जाणवेल अशी खात्री आहे . ‘मन माझे कुरुक्षेत्र’

हा श्री प्रकाश पाठक ह्यांचा कवितासंग्रह आपल्या संग्रही नक्कीच ठेवावा अशा ह्या देखण्या कवितासंग्रहाला माझ्या शुभेच्छा🙏🙏

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा