पर्यावरण जनजागृतीसाठी ‘कासव मित्र’ महत्त्वाचे – तृप्ती धोडमिसे; वेंगुर्ला वायंगणी बीचवर कासव महोत्सव उत्साहात
वेंगुर्ला :
निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव पर्यावरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण मानला जात असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे.
समुद्रकिनारी कासवांच्या अंड्यांपासून पिल्ले बाहेर येण्याचा अद्भुत नजारा अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हा महोत्सव केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ ठरत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन विभाग (दक्षिण कोकण वनपरिक्षेत्र, मालवण) यांच्या वतीने वेंगुर्ला वायंगणी बीच येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरीप, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राउळ, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा समीक्षा चंद्राकार, तहसीलदार ओंकार ओतारी, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, कासव महोत्सवामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळत असून, पश्चिम सागरी किनारपट्टीवर कासव मोठ्या प्रमाणात अंडी देण्यासाठी येतात ही आनंदाची बाब आहे. ‘कासव मित्र’ यांची भूमिका या संवर्धन मोहिमेत अत्यंत महत्त्वाची असून या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो कासव पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. तसेच आरवली येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव वाळूशिल्पाचे अनावरण करण्यात आले. कासव संवर्धनात उल्लेखनीय काम करणाऱ्या ‘कासव मित्रां’चा यावेळी सन्मानही करण्यात आला.
