You are currently viewing पडेलमध्ये उबाठा पक्षाला धक्का; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पडेलमध्ये उबाठा पक्षाला धक्का; पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नितेश राणे यांच्या हस्ते पक्षप्रवेश

ग्रामपंचायत सदस्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग

देवगड / प्रतिनिधी :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पडेल येथे उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या प्रवेशामध्ये सौ. प्रतिक्षा प्रभाकर माळगवे, श्री. सिद्धेश्वर मनोहर पाटणकर (ग्रामपंचायत सदस्य, पडेल), श्री. तानसेन पायाजी पडेलकर (संचालक, पडेल विकास सोसायटी), श्री. चंद्रशेखर विजय सुतार (शहरप्रमुख, पडेल), श्री. राजेंद्र बळीराम परब (संपर्क व प्रचारप्रमुख, पडेल) तसेच श्री. प्रभाकर शांताराम माळगवे यांचा समावेश आहे.

राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात पडेल येथील उबाठा पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करत आपला राजकीय कल स्पष्ट केला. या घडामोडीमुळे देवगड तालुक्यातील स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

हा प्रवेश सोहळा ओरोस येथील पत्रकार भवनात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, देवगड मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा